Bharat Gaurav Train : ‘भारत गौरव’ ट्रेनने शिवभक्तांची ऐतिहासिक यात्रा सुरू

•छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थळांशी जोडणाऱ्या या विशेष ट्रेनचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेन मुंबईतून रवाना
मुंबई :- मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारी ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ रविवारी (8 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) यांच्या पुढाकाराने या विशेष ट्रेनची सुरुवात झाली आहे.



या ट्रेनचा उद्देश शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही यात्रा 5 दिवस चालणार असून, यात रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पन्हाळगड या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “351 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवणारी ही यात्रा अत्यंत प्रेरणादायी आहे.” त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
या ट्रेनच्या पहिल्या टप्प्यातच 100% बुकिंग झाले असून, 710 प्रवासी सहभागी झाले आहेत. यातील 80% प्रवासी 40 वर्षांखालील आहेत, जे युवकांच्या इतिहासात वाढत्या रुचीचे द्योतक आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, एकूण 14 डब्यांची ही ट्रेन केवळ पर्यटनच नव्हे तर सांस्कृतिक जागरूकतेलाही नवा आयाम देणार आहे.



