ठाणे

Sanjay Raut : “निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंडेड शाखा; भाजप चोरांचा सरदार!” संजय राऊत यांचा आयोगासह फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut On Devendra Fadnavis : “निवडणूक आयोग, आरएसएस, एबीव्हीपी हे भाजपच्या एक्सटेंडेड शाखा”; गंभीर आरोप

मुंबई :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला धारेवर धरल्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत दोन दिवस चर्चा होऊनही आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने राऊत आक्रमक झाले. ते म्हणाले, “निवडणूक याद्याच बोगस असतील, तर त्या याद्यांना महत्त्व काय? चुकीच्या पद्धतीने मत जात असेल, तर त्याला अर्थ काय?”

राऊत यांनी यावेळी आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. जशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वा अन्य संघटना आहेत, त्याप्रमाणे निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे.”

“निवडणूक आयोगातील माणसं जर भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील, तर आम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार?” असा सवाल करत या याद्यांतील घोळ ‘गुन्हेगारीसारखं’ काम असल्याचं दाखवणं, हे आपले कर्तव्य आहे, असे राऊत म्हणाले.

फडणवीसांवर ‘पेशवाई’चा संदर्भ देत टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाविकास आघाडी ही आता महा कन्फ्युज आघाडी झाली आहे,’ अशी टीका केली होती. त्याचा राऊतांनी खरपूस समाचार घेतला.

राऊत म्हणाले, “निवडणूक आयोग हा चोर आहे आणि भाजप हा चोरांचा सरदार आहे. त्यामुळे चोर चोर कसं भेटणार? म्हणून भाजपने आमच्या शिष्टमंडळात येण्याचे आमंत्रण नाकारले.”

फडणवीसांवर थेट हल्ला करताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या पंजोबा नाना फडणवीस हे सुद्धा असेच बोलायचे. पेशवाईतील जे साडेतीन शहाणे होते, त्यात फडणवीस हे अर्धे शहाणे होते, म्हणूनच पेशवाई बुडाली. देवेंद्र फडणवीस हे तर त्यापेक्षाही कमी शहाणे दिसत आहेत.”

“तुम्ही चोऱ्या करता, घोटाळे करता आणि बोगस मतदानावर निवडणूक जिंकता, यात कन्फ्युजन काय आहे मिस्टर फडणवीस? मला सांगा जरा,” असा थेट सवाल राऊत यांनी विचारला. फडणवीसांसारखा गोंधळलेला मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही, असे म्हणत ते ‘कर्तृत्वावर नव्हे, तर नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने मुख्यमंत्री झाले आहेत,’ अशी टीका राऊतांनी केली.

vivek

Recent Posts