
Sanjay Raut On Eknath Shinde : अजित पवारांच्या पक्ष सोडण्यावर भाष्य ; भाजपला वैचारिक लढाईची सवय नाही | अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दिला दाखला
मुंबई :- “एकनाथ शिंदे Eknath Shinde हे पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. भाजपने शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला आणि त्यांना काही काळासाठी मुख्यमंत्री केले. मात्र, आता भाजप त्यांना पुन्हा संधी देणार नाही,” असा मोठा दावा शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे. पुण्याच्या हनुमंत पवार मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजपसह सर्वोच्च न्यायालयावरही गंभीर आरोप केले आहेत.
‘सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भाजपचे कार्यकर्ते’
संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर टीका करताना अत्यंत कठोर शब्द वापरले. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टातील बरेच न्यायाधीश हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्या देशाच्या सुप्रीम कोर्टाला ‘मूर्ख’ म्हटले होते, कारण तिथे लोकशाहीपेक्षा ठराविक विचारधारेला महत्त्व दिले जात होते. लोकशाहीत आम्हाला आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.”
भाजपकडे कोणता विचार आहे?
“भाजपच्या नेत्यांना लोकशाहीबद्दल थोडी जरी चाड असेल, तर त्यांनी राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीकडे लक्ष द्यावे,” असे आवाहन करत राऊत यांनी भाजपच्या विचारधारेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विचारांची लढाई आपण विचारांनी लढू शकतो, पण समोरच्याकडे विचार असावा लागतो. हिंदू-मुस्लिम या पलीकडे भाजपकडे कोणता राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक विचार आहे? त्यांच्याकडे कोणता विचारच नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
अजित पवारांच्या फुटीवर मोठे विधान
अजित पवारांसह इतर नेत्यांनी राष्ट्रवादी का सोडली, यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “माणसाचा जीव इतका नकोसा करायचा की, वैतागून त्याने आपला पक्ष सोडावा आणि समोरच्या पक्षात जावे. हेच अजित पवारांच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा नवाब मलिक हे कुणीही प्रेमाने भाजपजवळ गेलेले नाहीत. केवळ आपली कातडी आणि संपत्ती वाचवण्यासाठी त्यांना हे पाऊल उचलावे लागले, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.”
लोकशाहीचा गळा घोटला जात आहे
पुण्यातील हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. “जर देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मात्र, सत्तेचा वापर करून विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे,” असेही ते म्हणाले.



