मुंबई

Sanjay Raut : 30 सेकंदांत कोसळलं ड्रीमलायनर; अपघातामागे सायबर हल्ला?संजय राऊतांचा संशय

•ब्रिटन-अमेरिकेच्या यंत्रणाही भारतात; ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती येण्याची शक्यता

मुंबई | एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानाचा अहमदाबादजवळ घडलेला भीषण अपघात अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे. या अपघातामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, शुक्रवारी सापडलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ३० सेकंदांत हे विमान कोसळल्याने तांत्रिक बिघाड वा सायबर हल्ल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “विमानाच्या दोन्ही इंजिनांनी एकाच वेळी काम करणे थांबवले, हा योगायोग असूच शकत नाही,” असं मत त्यांनी मांडलं. राऊत यांच्या मते, हा सायबर हल्ल्याचा भाग असू शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ब्रिटन आणि अमेरिकेतील तज्ज्ञ पथके भारतात दाखल झाली असून, चौकशीच्या दिशेने काम सुरू झालं आहे. भारतीय केंद्रीय यंत्रणाही यामध्ये सहभागी आहेत.

राऊत म्हणाले की, “बोईंग ड्रीमलायनरची खरेदी यूपीए सरकारच्या काळात झाली. त्यावेळी भाजपानेच त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आज त्याच बोईंगच्या ड्रीमलायनरवर शंका घेण्याची वेळ आली आहे.”

सध्या तांत्रिक तपास सुरू असला तरी सायबर हल्ल्याच्या शक्यतेने देशाची सुरक्षा व्यवस्था हादरली आहे. “शत्रू राष्ट्राकडून आपल्या तंत्रज्ञानावर, यंत्रणांवर सायबर हल्ले होतात, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे,” असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

vivek

Recent Posts