
Bala Nandgaonkar On Raj Uddhav : बाळा नांदगावकर भावुक, एकतेच्या क्षणी डोळ्यांत अश्रू
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडला — जे अनेकांना अशक्य वाटत होतं, ते प्रत्यक्षात उतरलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येऊन मराठी एकतेचा नवा अध्याय रेखाटला.
वरळीतील मराठी विजयोत्सवात “वज्रमूठ” फक्त हातात नव्हती, ती मनात होती — शिवसैनिक आणि मनसैनिक दोघेही ‘एक मराठी – एक मुठ’ या घोषणांमध्ये हरवून गेले होते. अनेक वर्षांच्या अंतराला आज अंत आला आणि राज्यात ‘मराठी शक्ती’ पुन्हा नव्या उमेदीने उभी राहिली आहे.
या भावनिक क्षणी ज्यांचा संघर्ष कायम होता, ते मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर व्यासपीठापासून दूर असले तरी हृदयाच्या मध्यवर्ती जागी होते. त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर करत लिहिलं – “हा क्षण माझ्या स्वप्नांचा विजय आहे.” एकेकाळी या दोन बंधूंना पुन्हा एकत्र आणण्यासाठी नांदगावकरांनी केलेले प्रयत्न आज फळाला आले आहेत.
काय आहे बाळा नांदगावकर यांची पोस्ट?
दरम्यान, आज बाळा नांदगावकर यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की याचसाठी केला होता अट्टाहास असं म्हणत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या. त्यांनी ठाकरे कुटुंबांचा एकत्रित फोटो शेअर करतानाच आपली मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, याचसाठी केला होता अट्टाहास. गेली दोन दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. मा. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील. राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षेच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो. त्यात आज आषाढी सारखा अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.



