
Sanjay Raut On Congress : ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा ही काँग्रेसच्या गटबाजीची शिक्षा; ‘सामना’तून बातमी गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई | चंद्रपूर महानगरपालिकेत Chandrapur BMC Election ठाकरे गटाने भाजपला साथ दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या निर्णयावरून काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, आज संजय राऊत यांनी या टीकेचा समाचार घेत काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे. “चंद्रपुरात काँग्रेसकडे सर्वाधिक 27 नगरसेवक होते, तरीही त्यांना सत्ता का मिळवता आली नाही? विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत संघर्षानेच काँग्रेसचा घात केला,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा शिवसेनेला फटका?
संजय राऊत यांच्या मते, काँग्रेसमधील दोन गटांच्या भांडणामुळे पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या इतर नगरसेवकांचाही भ्रमनिरास झाला. “काँग्रेस स्वतःचे घर सावरू शकली नाही आणि आता शिवसेनेला दोष देत आहे, यात काहीच अर्थ नाही. ज्यांना पाठिंबा द्यायचा होता, त्यांना काँग्रेसच्या वागणुकीमुळेच वेगळा निर्णय घ्यावा लागला,” असे म्हणत राऊतांनी स्थानिक परिस्थितीचे खापर काँग्रेसवरच फोडले.
‘मातोश्री’च्या आदेशाचे काय झाले?
स्थानिक पातळीवर युती झाली असली तरी, संजय राऊत यांनी एक महत्त्वाची कबुली दिली आहे. “उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की काहीही झाले तरी भाजपसोबत जाऊ नका. तरीही चंद्रपुरात हा निर्णय कसा घेतला गेला, याची चर्चा आम्ही मुंबईत करणार आहोत,” असे राऊत म्हणाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांचा आदेश का मोडला, यावर आता कारवाईची टांगती तलवार असण्याची शक्यता आहे.


