Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मौलवींच्या वेशात दिल्लीवारी करायचे ; खासदार संजय राऊत
•शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे, अजित पवार यांच्या वेशांतर दिल्ली वारीवर भाष्य
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी बोलतांना मी सत्ता नाट्यावेळी वेष बदलून दिल्लीला जायचो. वेगळ्या नावाने बोर्डिंग पास काढायचो असा खुलासा केला होता. यावरूनच राऊतांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.अजित पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे हे देखील मौलवींच्या वेशात दिल्ली वारी करायचे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी माध्यमांना माहिती दिली की, ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेष बदलून गेले. नुसते वेष बदलून गेले नाही, तर बनावट नावाने गेले. वेगवेगळी नावं आहेत, त्यामुळे त्यांची सर्व बोर्डीग जप्त करावी. कोणी म्हणतो ए. पी. अनंतराव, तर कोणी म्हणतो ए. पवार या नावाने ते दिल्ली गेले. दाढी-मिश्या लावल्या होत्या, टोपी घातली होती, अशा बऱ्याच गोष्टी केल्याचे ते स्वतः सांगत आहेत”, असे म्हणते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली.
महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे. अनेक कलावंत या महाराष्ट्राने रंगभूमीला दिले. विष्णूदास भावे यांनी 1842-43 साली रंगभूमीची स्थापना केली. त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णूदास भावे निर्माण झालेले आहेत. त्यांनी वेष बदलला हा प्रश्न नाही आहे, तर विमान तळाची सुरक्षा किती ढिसाळ आहे की, कोणताही माणूस बनावट नावाने वेष पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी या काळामध्ये जो खेळ झाला आहे. त्यात या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सामील आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“अजित पवार यांचे उदाहरण घेऊन अतिरेकी नाव बदलून, वेष बदलून देशात घुसू शकतात. दाऊन इब्राहिम किती वेळा भारतात आला असेल? याशिवाय परदेशात जे उद्योगपती पळून गेले आहेत, त्यांनी अशाप्रकारे दिल्ली आणि मुंबई विमानतळावरून अनेकदा प्रवास केला आहे का? दाऊद इब्राहिम, कादर मेनन, छोटा शकील यांना सुद्धा वेष पालटून मुंबई आणि दिल्लीमध्ये येण्याची मुभा मिळाली होती का? असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यातून अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा मिळाली आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.