मुंबई

Sanjay Raut : “अदनान सामीसोबत नाश्ता आणि ‘त्या’ नटीचं कौतुक; संघाची हीच का राष्ट्रभक्ती?” संजय राऊतांचा सरसंघचालकांवर घणाघाती हल्ला

•शताब्दी सोहळ्यातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून ‘सामना’तून तोफ डागली; “देश अमेरिकेचा गुलाम झाला, जबाबदारी भागवतांनी घ्यावी!”

मुंबई | मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ‘नवे क्षितिज’ या शताब्दी वर्ष सोहळ्यावरून आता राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्श्वभूमीवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संघ आणि भाजपच्या राष्ट्रभक्तीवर बोचऱ्या शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “संघाच्या व्यासपीठावर गुन्हेगारी आणि भारतविरोधी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा वावर म्हणजे पापावर पांघरुण घालण्याचा प्रकार आहे,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

अदनान सामीच्या उपस्थितीवर संताप: “पठाणकोटवर बॉम्ब टाकणाऱ्याचा मुलगा सरसंघचालकांसोबत?” संजय राऊत यांनी गायक अदनान सामी याच्या उपस्थितीवरून सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट लक्ष्य केले. राऊत म्हणाले, “अदनान सामीचे वडील पाकिस्तानच्या हवाई दलात होते आणि 1965 च्या युद्धात त्यांनी भारतावर बॉम्बफेक करून पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. असा व्यक्ती सरसंघचालकांच्या शेजारी बसून नाश्ता करतो, हे पाहून धक्का बसला. ज्यांनी निमंत्रण दिले त्यांना इतिहास माहित नाही का? अशा लोकांमुळे देशाला कोणती प्रेरणा मिळणार?”

सेलिब्रिटी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून टोला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही अभिनेत्रींच्या उपस्थितीवरही राऊत यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले.”ज्या अभिनेत्रीवर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लुकआऊट नोटीस आहे आणि जिचा पती अश्लील चित्रपट बनवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात होता, ती नटी ‘आय लव्ह भागवत’ म्हणतेय. हे सर्व पाहून संघाचे चारित्र्य किती बिघडले आहे, हे दिसून येते. अशा वादग्रस्त लोकांना बोलावून संघ आपल्या पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“देश अमेरिकेचा गुलाम झाला, याचे उत्तर द्या!” देशाच्या सद्यस्थितीला संघाला जबाबदार धरत राऊत पुढे म्हणाले की, संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’ आले असतील, पण भाजपच्या सत्तेमुळे देशाचे ‘अच्छे दिन’ निघून गेले आहेत. आज भारत देश अमेरिकेचा गुलाम बनला असून याची सर्वस्वी जबाबदारी सरसंघचालकांनी स्वीकारायला हवी.चारित्र्याच्या गोष्टी करणाऱ्या संघाने सत्तेसाठी गुन्हेगार आणि व्याभिचाऱ्यांना पक्षात घेणाऱ्यांना पाठबळ दिले, हे दुर्दैवी आहे.

सावरकरांच्या भारतरत्नावरून कोंडीत पकडले वीर सावरकरांच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी संघाला आरसा दाखवला. “सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. तुमचेच सरकार आहे, मग तरीही सावरकरांना सन्मान का मिळत नाही? हा प्रश्न मोहन भागवत यांनी भाषणातून विचारण्यापेक्षा थेट पंतप्रधान मोदींना विचारायला हवा. भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे,” अशी चपराक त्यांनी लगावली.

vivek

Recent Posts