Sanjay Raut On Devendra Fadnavis : बेस्टला तोट्यात आणून बंद पाडण्याचा मनसुबा; डेपोंचा पुनर्विकास खासगी बिल्डरांकडून होणार, राऊतांचा दावा
मुंबई :- शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील बेस्टच्या भूखंडांवर भाजपप्रणीत बिल्डरांचा डोळा असून, बेस्टला तोट्यात आणून ती बंद पाडण्याचा मोठा कट रचला जात असल्याचा दावा राऊतांनी पत्रकार परिषदेत केला.
राऊत म्हणाले की, “अख्खी मुंबई फडणवीसांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. भविष्यात बेस्टला तोट्यात आणून ती बंद पाडण्याचा मनसुबा आहे आणि त्यानंतर बेस्टच्या जागांचा पुनर्विकास करायचा आहे. फडणवीस यांच्या लाडक्या बिल्डर आणि विकासकांच्या माध्यमातून बेस्टच्या डेपोंचा विकास करायचा आहे. प्रसाद लाड हे सुद्धा बिल्डरच आहेत.” त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर नियंत्रण मिळवून डेपोंमध्ये आपल्या बिल्डर्सना शिरकाव करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही केला.
पतपेढी निवडणुकीतील पराभवावर भाष्य
बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या पॅनलचा दारुण पराभव झाला होता. या पराभवाचे कारण सांगताना राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “या निवडणुकीत भाजपने एक मत पाच-पाच हजारांना विकत घेतले. 1800 मतं अवैध ठरवण्यात आली, त्यातील बहुसंख्य मतं ही शिवसेनेच्या पॅनलला पडली होती. शिवाय, भाजपनेच उभ्या केलेल्या अपक्षांनीही सुमारे १ हजार मतं खाल्ली. शिवसेनेचा पराभव करण्यासाठीच हा सर्व प्रयत्न झाला.”
‘शिंदे-फडणवीस म्हणजे ब्रँडीच्या बाटल्या’
राऊत यांनी यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्लाही चढवला. प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिरातींवरून बोलताना ते म्हणाले, “हे कसले ब्रँड. खरा ठाकरे ब्रँड आहे. शिंदे, फडणवीस म्हणजे ब्रँडीच्या बाटल्या आहेत. त्याने नशा सुद्धा होत नाही, त्या विषाच्या बाटल्या आहेत.” यावेळी त्यांनी न्यायालयावरही टीका करत शिंदे यांच्यावर कारवाईचे आदेश द्यायला हवे होते, पण कोर्टाचे धोरण बोटचेपे असल्याचा आरोपही केला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…