
Kailash Shinde To Eknath Shinde : निष्ठेपेक्षा पैशाला महत्त्व’, निवडणुकीच्या राजकारणावर माजी सभागृह नेत्याचा परखड प्रहार
कल्याण | “तुमच्याकडे फक्त पैसा असेल तरच तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र आहात, असा आता नियमच झाला आहे. माझ्याकडे निष्ठा आहे, अनुभव आहे, पण निवडणुकीसाठी लागणारे ‘आर्थिक बळ’ नाही. त्यामुळे मी पात्र ठरत नसेन, तर माझी पक्षातून हकालपट्टी करा,” अशा शब्दांत कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी सभागृह नेते कैलास शिंदे Kailash Shinde यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.

पैशाच्या राजकारणावर ओढले ताशेरे
कैलास शिंदे यांनी आपल्या पत्रात सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका केली आहे. “देशात, राज्यात आणि शहरात सध्या जे राजकारण सुरू आहे, तिथे निष्ठेला आणि शिक्षणाला शून्य महत्त्व उरले आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाते,” असा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.
“मी पात्र नाही, म्हणून हकालपट्टी करा”
एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘गुरुबंधू’ आणि आनंद दिघे यांचा उल्लेख ‘गुरुवर्य’ असा करत कैलास शिंदे लिहितात, “एक कट्टर कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे सर्व गुण आहेत, पण राजकारणासाठी आवश्यक असणारी ‘आर्थिक सक्षमता’ माझ्याकडे नाही. त्यामुळे मी तिकीट मिळण्यास पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी माझी पक्षातून हकालपट्टी करावी ही नम्र विनंती.”
महायुतीमधील जागावाटपाचा पेच?
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून आधीच रस्सीखेच सुरू आहे. अशातच पक्षाच्या एका ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्याने अशा प्रकारचे पत्र लिहिल्यामुळे शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वावर दबाव निर्माण झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून केवळ श्रीमंत उमेदवारांना झुकते माप दिले जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


