Sanjay Raut : ‘मुंबईतील भाजप कार्यालयाच्या जागेत मोठा घोटाळा!’ – संजय राऊतांचा अमित शहांना थेट पत्र

• ‘प्रशासकीय नियमांना हरताळ फासला; मोक्याची जागा अवघ्या 11 दिवसांत हस्तांतरित’ – राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (27 ऑक्टोबर ) मुंबईतील मरीन लाईन्स येथे महाराष्ट्र भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या या कार्यालयाच्या जागेवरून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांनी या संदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.
राऊत यांचे पत्रातील मुख्य आरोप
भाजपने मरीन लाईन्स एक्साईडजवळच्या मोक्याच्या जागेवरील भूखंड तातडीने हस्तांतरित करून घेण्यासाठी प्रशासकीय नियमांना हरताळ फासल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
ताब्यात घेण्याची घाई: भाजपने हा भूखंड ‘एकनाथ रिॲल्टर्स’ कडून अवघ्या 11 दिवसांत ताब्यात घेतला आणि त्यावर भव्य कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला.
प्रशासकांकडून मदत: मुंबई महापालिकेवर सध्या भाजपच्या मर्जीतील प्रशासक बसलेले आहेत. नागरिकांच्या विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असताना, भाजपचा इंटरेस्ट असलेली ही फाईल वेगाने फिरवून तत्काळ निर्णय घेण्यात आला, याबद्दल राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले.
हस्तांतरण प्रक्रिया: जागेचा मूळ मालकी हक्क महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशनकडे होता. नंतर एकनाथ रिॲल्टर्सला 46 टक्के भाडेपट्टा मिळाला होता. उर्वरित 54 टक्के जागेसाठी एकनाथ रिॲल्टर्सने अर्ज करताच त्याला तत्काळ मंजुरी देण्यात आली.
मध्यरात्री व्यवहार पूर्ण: 21 कोटींहून अधिक हस्तांतरण अधिमूल्य भरून एकनाथ रिॲल्टर्सने भूखंड ताब्यात घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई उपनगर (सुधार) समितीने 29 मे 2025 रोजी अर्जाला मंजुरी दिली. ही मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या 11 दिवसांत भूखंड हस्तांतरण पूर्ण करण्यात आले. भाजपने जवळपास ३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरून ही जागा ताब्यात घेतली.
राऊतांचा थेट आरोप
राऊत यांनी आरोप केला आहे की, मरीन लाईन्स येथील या जागेवर जोरजबरदस्ती आणि अनियमितता करण्यात आली आहे. “प्रशासनातील अधिकारी व एकनाथ रिॲल्टर्स यांनी संगनमत करून मध्यरात्रीत घाईगडबडीत हा व्यवहार भाजपच्या पदरात पाडला,” असा थेट आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
संजय राऊत यांनी देशाचे गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांना या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याची आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे.



