
Sanjay Raut On Girish Mahajan : नाशिकमधील प्रभाग 30 च्या निकालावरून खळबळ; अल्पसंख्याक मतांच्या गणितावरून भाजप नेत्यांमधील संभाषणाने राजकारण तापले
नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीत Nashik BMC Election 72 जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी प्रभाग क्रमांक 30 (ड) मधील विजयाची चर्चा आता वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. या प्रभागातील भाजपचे उमेदवार अजिंक्य साने यांच्या विजयानंतर आमदार राहुल ढिकले आणि राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार!” अशा बोचऱ्या कॅप्शनसह राऊतांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आमदार राहुल ढिकले मंत्री गिरीश महाजन यांना साने यांच्या विजयाबद्दल सांगताना दिसत आहेत. या संभाषणात अल्पसंख्याक समाजाच्या मतांमुळे हा विजय सुकर झाल्याचा आणि विशिष्ट भागातील मतदानामुळे पॅनल निघाल्याचा उल्लेख असल्याचे राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना,” अशा आशयाचे विधान या व्हिडिओत ऐकू येत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. या व्हिडिओमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक राहणाऱ्या भाजपला आता बॅकफूटवर जावे लागत आहे.
प्रभाग 30 चे नेमके गणित काय?
प्रभाग 30 (ड) मध्ये भाजपचे अजिंक्य साने यांनी शिंदे गटाचे उमेदवार सागर देशमुख यांचा अवघ्या 325 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराने सुमारे 4,500 मते घेतल्यामुळे मतविभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुस्लीम बहुल भागातून सागर देशमुख यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत आणि एमआयएममुळे प्रतिस्पर्धी मतांची विभागणी झाली, हेच भाजपच्या विजयाचे कारण ठरल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आणि राहुल ढिकले यांच्यातील संभाषणाने विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.
संजय राऊत यांच्या या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, महापालिका निवडणुकीनंतरही नाशिकमधील राजकीय संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये.



