
Sanjay Raut On Election Commission : “जबरदस्तीने माघार, पैशाचा पाऊस आणि तीन नंतरही अर्ज स्वीकारले”; राऊतांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालयावर खळबळजनक आरोप
मुंबई | राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होत असतानाच, 66 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला जात आहे. या धक्कादायक प्रकारावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रखर टीका केली आहे. “अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत कोणीही आजवर बिनविरोध निवडून आले नाही, मग या 66 लोकांचे असे काय कर्तृत्व आहे की लोकांनी त्यांना मतदान न करताच स्वीकारले?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
पैशाचा पाऊस आणि दबावाचे राजकारण
राऊत यांनी या बिनविरोध निवडीमागे ‘भ्रष्टाचाराचा खेळ’ असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “उमेदवारांना माघार घेण्यासाठी 5 ते 10 कोटी रुपयांच्या बॅगा दिल्या जात आहेत. मनसेच्या मनोज घरत यांना माघार घेण्यासाठी जी रक्कम दिली, ती ऐकून डोळ्याचे बुबूळ बाहेर येईल. जळगाव असो की कल्याण-डोंबिवली, सगळीकडे पैशाचा नंगानाच सुरू आहे.” जबरदस्तीने उमेदवारांना माघार घ्यायला लावणे हा महाराष्ट्रातील लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक आयोगावर ‘हरकामे’ असल्याची टीका
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. “निवडणूक आयोग या भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचे ‘पाळीव मांजर’ झाले आहे. आयोगाचे अधिकारी केवळ सरकारचे नोकर म्हणून काम करत आहेत,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून थेट सूचना देऊन ३ वाजेची वेळ संपल्यानंतरही अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली गेली, असा दावाही त्यांनी केला.
“मतदारांनी काय करायचं?”
“जर उमेदवार विकले गेले किंवा दबावामुळे मागे हटले असतील, तर त्या भागातील मतदारांच्या हक्काचे काय?” असा मूलभूत प्रश्न राऊत यांनी विचारला. “निवडणूक अधिकाऱ्यांचे (RO) गेल्या 24 तासांतील फोन कॉल्स तपासा, कोणत्या पालकमंत्र्यांचे फोन आले हे चेक करा, म्हणजे या ‘बिनविरोध’ मागील गुपित उघड होईल,” असे आव्हान त्यांनी दिले.
ऐतिहासिक संदर्भांचा दाखला
राऊत यांनी आपल्या भाषणात बॅ. नाथ पै, वसंतदादा पाटील आणि राममनोहर लोहिया यांसारख्या दिग्गज नेत्यांचा उल्लेख केला. या महान नेत्यांनाही लोकांनी कधी बिनविरोध निवडून दिले नाही, मग महाराष्ट्रात हा कोणता नवीन ‘ट्रेन्ड’ सुरू आहे, असे म्हणत त्यांनी महायुतीला घरचा आहेर दिला.


