सांगली-मिरज

Sangli News : सांगलीत वाढदिवसाच्या पार्टीत दुहेरी हत्याकांड! दलित महासंघाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या; एका आरोपीचाही मृत्यू

•’तुझ्या भावाला जिवंत सोडत नाही’ म्हणत पुतण्यावरही वार; जुन्या वादातून 8 जणांच्या टोळक्याचे कृत्य; मृताच्या मुलीचा पोलिसांवर गंभीर आरोप

सांगली :- सांगलीतील गारपीर चौकात मंगळवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दलित महासंघ (मोहिते गट) चे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असतानाच, गणेश मोरे याच्या नेतृत्वाखालील आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर निर्घृण हल्ला करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, या हल्ल्यात शाहरुख शेख नावाच्या एका आरोपीचाही मृत्यू झाला आहे.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात हत्याकांड

उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने गारपीर चौक परिसरात त्यांच्या घराशेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मित्र आणि नातेवाईकांसाठी जेवण ठेवले होते. याच वेळी गणेश मोरे आणि त्याचे टोळके (यात सतीश लोखंडे, शाहरुख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले यांचा समावेश होता) कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांना आत सोडण्यावरून वाद झाला.

उत्तम मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय 21) याने गणेश मोरे याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्यावेळाने या आठ जणांच्या टोळक्याने चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे आणि काठी घेऊन मोहिते यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी उत्तम मोहिते यांच्या पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात आणि हातावर वार करून त्यांचा खून केला. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पुतण्या योसेफ मोहिते यालाही ‘तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणत गणेश मोरे याने त्याच्या छातीवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

आरोपीचाही झाला मृत्यू

उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करत असताना आरोपींपैकी शाहरुख शेख याच्या पायाला चाकू लागला आणि मोठी नस कापली गेली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आज सकाळी त्याचाही मृत्यू झाला.

पोलिसांवर गंभीर आरोप: या घटनेनंतर उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “गणेश मोरे या परिसरात गुंडगिरी करत होता. काल त्याने माझ्या वडिलांची हत्या केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात माझ्या भावावर (योसेफ मोहिते) देखील हल्ला करण्यात आला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती,” असा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. आरोपी आणि मृतांमध्ये जुने भांडण होते, याच वादातून हा हल्ला करण्यात आला असून, सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0