Sandipan Bhumare : खासदार भुमरेंच्या चालकाच्या 150 कोटींच्या जमिनीची चौकशी

•महसूलमंत्र्यांनी दिले आदेश; ‘बक्षीसपत्र’ व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला बक्षीसपत्र म्हणून मिळालेल्या 150 कोटी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहाराची आता महसूल विभागाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती देताना, या प्रकरणाची गंभीर तक्रार आल्याने अतिरिक्त मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
संदीपान भुमरे यांचा चालक असलेल्या जावेद रसूल शेख याला हैदराबादमधील सालारजंग कुटुंबातील एका सदस्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील 12 एकर जमीन बक्षीसपत्र (हिबानामा) म्हणून मिळाली आहे. रेडी रेकनर दरानुसार या जमिनीची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. याच प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
परभणीचे वकील मुजाहीद खान यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ‘हिबानामा’ हा केवळ रक्ताच्या नात्यातील व्यक्तीमध्येच कायदेशीर मानला जातो. मात्र, जावेद रसूल शेख आणि सालारजंग कुटुंबातील सदस्य यांच्यात असे कोणतेही नाते नाही, असे मुजाहीद खान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, ते दोघे वेगवेगळ्या पंथांचे असल्याने या व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याच प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे. त्यांनी चालक जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावून त्याच्याकडून उत्पन्नाचा स्रोत, आयकर रिटर्न आणि ही जमीन कोणत्या आधारावर मिळाली, याची माहिती मागवली आहे. ज्या सालारजंग कुटुंबाने हे बक्षीसपत्र दिले, त्यांच्याकडूनही चौकशीत सहकार्य अपेक्षित आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात खासदार भुमरे आणि त्यांच्या आमदार मुलाचा सहभाग असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.



