
Sandip Deshpande T- shirt : टी-शर्टवरील संदेशावरून वादंग
मुंबई :- मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता गुजराथी भाषिकांना लक्ष्य केले आहे. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी नुकताच ‘परेस, नरेस, सुरेस चड्डीत रहायचं’ असा संदेश असलेला टी-शर्ट परिधान करून एक नवीन वाद निर्माण केला आहे. या संदेशात गुजराथी भाषिकांच्या उच्चारांची खिल्ली उडवण्यात आली असून, ‘श’ ऐवजी ‘स’चा वापर करण्यात आला आहे. हे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मनसे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आक्रमक झाली आहे. मीरा रोडमध्ये परप्रांतीय विक्रेत्याला मारहाण झाल्यानंतर मराठीजनांनी मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे जाहीर सभा घेऊन मराठीचा अपमान सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. हा वाद शांत होत असतानाच आता दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरून स्थानिक मराठी विरुद्ध गुजराथी आणि जैन समाजात वाद पेटला आहे. कबुतरखान्याच्या विरोधात मराठी भाषिकांनी भूमिका घेतली आहे, तर गुजराथी आणि जैन समाजाने त्याविरोधात आंदोलन केले होते. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी हा टी-शर्ट घालून गुजराथी भाषिकांना प्रत्युत्तर दिले असल्याचे मानले जात आहे.
संदीप देशपांडे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर हे टी-शर्ट घातलेले छायाचित्र प्रसारित केल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मनसेच्या या भूमिकेचे समर्थन करत, ‘मराठीची गळचेपी करणाऱ्या गुजराथी भाषकांना हा सणसणीत इशारा’ असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, कारण ते हिंदू असलेल्या गुजराथींना लक्ष्य करत आहेत. तर काहींनी ‘मुस्लिमांची नावे लिहिण्याची हिंमत आहे का?’ असा सवालही विचारला आहे.
यापूर्वी संदीप देशपांडे यांनी ‘मी हिंदू आहे हिंदी नाही’ असा संदेश असलेले टी-शर्टही घातले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता ‘लाव रे तो व्हिडिओ’ नंतर ‘घाल रे तो टी-शर्ट’ अशी मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या नव्या वादाचा आगामी काळात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


