
Sandip Deshpande On Ashish Shelar : “अडाणींच्या फॅमिलीसाठी महापालिका हवीय का?”; मनसे-भाजपमध्ये ‘व्हिडिओ वॉर’ आणि शब्दांचे युद्ध पेटले
मुंबई | ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीनंतर मुंबईच्या राजकारणात आता मनसे आणि भाजपमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी कवितेतून केलेल्या टीकेला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी अत्यंत जहाल भाषेत प्रत्युत्तर दिले. “आशिष कुरेशी ही मुंबईला लागलेली बुरशी आहे,” असा वैयक्तिक टोला लगावत देशपांडे यांनी भाजपवर ‘मराठी विरुद्ध उत्तर भारतीय’ असा वाद जाणीवपूर्वक निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एआय जनरेटर ‘माकडाने’ हे सगळं केलं!
मुंबईत लागलेल्या वादग्रस्त पोस्टर्सवरून संदीप देशपांडे यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, “मराठी माणसाचा अपमान आता सहन केला जाणार नाही. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा कोणताही वाद नाही, मात्र भाजपने ‘एआय जनरेटर माकडा’मार्फत हे सर्व घडवून आणले आहे. त्यांना केवळ उत्तर भारतीयांची मते हवी आहेत, म्हणून ते जाणीवपूर्वक हा वाद निर्माण करत आहेत.”
अडाणी आणि घोटाळ्यांवरून घेराव
देशपांडे यांनी महायुतीवर अदानी कुटुंबासाठी काम करत असल्याचा आरोप केला. “तुमची युती ही अदानी फॅमिलीसाठी आहे. तुम्हाला महापालिका अडाणींच्या हितासाठी ताब्यात हवी आहे का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, विकासकामांवर बोलताना त्यांनी ‘अटल सेतू’वरून टोला लगावला की, रोज किती लोक त्यावरून जातात? उलट शहरातील सर्व रस्ते खड्ड्यात गेले आहेत. २५ वर्षे सत्तेत असताना तुम्ही पहारेकरी म्हणून काय झोपा काढत होता का? अशा शब्दांत त्यांनी भाजपला धारेवर धरले.
“बात निकलेगी तो लंबी जाएगी!”
भाजप नेत्यांच्या नातेवाईकांवर टीका करताना देशपांडे यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. “सत्तेतील लोक गुंडांसारखे चोरायला लागले आहेत. अमित साटम यांचा मेव्हणा, आशिष शेलारांचा भाऊ, प्रवीण दरेकरांचे भाऊ… ही यादी खूप मोठी आहे. जर बोलायला लागलो तर ‘बात निकलेगी तो लंबी जाएगी’,” असा इशारा त्यांनी दिला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरसा दाखवला
आशिष शेलारांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना देशपांडे म्हणाले:
रझा अकादमी: “जेव्हा रझा अकादमीचा मोर्चा निघाला, तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते? तेव्हा कोण बाहेर आले?”
नवाब मलिक: “ज्या नवाब मलिकांवर आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. त्यांना सोडवण्याचे काम फडणवीसांनीच केले.”
सोमय्यांचा हातोडा: “छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना सत्तेत घेतले. किरीट सोमय्या हातोडा घेऊन गेले होते, त्याचे काय झाले?”



