•जागा ‘तुतारी’ला सोडल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष; आदित्य ठाकरेंच्या शिलेदाराने शड्डू ठोकल्याने राजकीय समीकरणे बिघडली
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस (30 डिसेंबर 2025) शिवसेना ठाकरे गटासाठी नाट्यमय ठरला. मालाडमधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू यांच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. युवासेनेचे राष्ट्रीय सहसचिव आणि आदित्य ठाकरे यांच्या कोअर टीममधील महत्त्वाचे सदस्य समृद्ध शिर्के यांनी प्रभाग क्रमांक 43 मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. पक्षाच्या आदेशाला आव्हान देत शिर्के यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 हा पारंपरिक रित्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आगामी महापालिकेत ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला येईल आणि समृद्ध शिर्के यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना खात्री होती. तसे आदेशही पक्षाकडून सुरुवातीला मिळाले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या अंतिम जागावाटपात हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सोडण्यात आला. हक्काचा प्रभाग ‘तुतारी’ला गेल्याने स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी कमालीचे नाराज झाले.
समृद्ध शिर्के यांची बंडखोरी ही केवळ एका उमेदवाराची नसून ती स्थानिक शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक असल्याचे बोलले जात आहे. “आम्ही रात्रंदिवस ज्या प्रभागात काम केले, तो प्रभाग मित्रपक्षाला दिल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे,” अशी भावना शिर्के समर्थकांनी व्यक्त केली आहे. शिर्के यांच्या या निर्णयामुळे आता प्रभाग 43 मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी समृद्ध शिर्के (अपक्ष) विरुद्ध महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार (राष्ट्रवादी शरद पवार गट) विरुद्ध महायुतीचा (भाजप) उमेदवार असा सामना रंगणार आहे.
शिवसेना नेत्यांकडून सध्या समृद्ध शिर्के यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2 जानेवारी 2026 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत शिर्के आपली तलवार म्यान करतात की मैदानात ठाम राहतात, यावर या प्रभागातील जय-पराजयाचे गणित अवलंबून असेल. जर शिर्के यांनी बंडाचे निशाण कायम ठेवले, तर मतांच्या विभाजनाचा थेट फायदा भाजपला मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…