मुंबई

Samna Lekh : ‘वॉशिंग मशीन’मध्ये खुनी ‘स्वच्छ’! पालघर साधू हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला प्रवेशावरून ‘सामना’चा भाजपवर तुफान हल्लाबोल

Samna Lekh On Maharashtra Sarkar : फडणवीस-रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करा! ‘खूनी, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजप हिंदुत्वाला लागलेला ‘खोडकिडा’ बनला’

मुंबई :- पालघरमधील गडचिंचले गावात दोन साधूंची (चिन्मयानंद स्वामी आणि स्वामी सुशीलगिरी महाराज) निर्घृण हत्या झाली होती. याच हत्याकांडातील मुख्य आरोपी काशीनाथ चौधरी याला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याच्या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र ‘सामना’ने आज भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीकास्त्र सोडले आहे.

‘सामना’ने म्हटले आहे की, त्यावेळी भाजप नेत्यांनी “पालघरमधील साधू हत्याकांडाने हिंदुत्वाला धक्का बसला” अशी बालिश विधाने केली होती. याच हत्याकांडातील मुख्य आरोपी काशीनाथ चौधरीला फाशी द्यावी अशी मागणी भाजपने केली होती, पण त्याच आरोपीला आता भाजपने आपल्या ‘वॉशिंग मशीनमध्ये’ टाकून ‘स्वच्छ’ केले आणि पक्षात प्रवेश दिला. “या अचाट कार्यासाठी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करायला हवा,” असा उपरोधात्मक टोला ‘सामना’ने लगावला आहे. भाजप खासदार हेमंत सावरा यांनी आरोपीच्या प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्याचेही अग्रलेखात नमूद केले आहे.

‘सामना’ने भाजपच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “भाजपची नीयत सडकी आहे,” असे म्हणत या नीचपणासाठी फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी ‘सामना’ने केली आहे. “फाशीच्या गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन निर्दोष सिद्ध करायचे, हा नवा पायंडा घातक आहे.” “आरोपी क्रमांक एकलाच पक्षात प्रवेश दिल्याने संपूर्ण खटलाच जमीनदोस्त होणार नाही काय?” असा थेट प्रश्न अग्रलेखाने उपस्थित केला आहे. हा प्रकार कायद्याची व सत्तेची मनमानी असल्याचे ‘सामना’चे मत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून भाजपने ‘ठाकरे सरकारने साधू हत्याकांड केले’ असे चित्र निर्माण केले होते. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनीही या हत्येबद्दल छाती पिटण्याचा जाहीर कार्यक्रम केला होता. आता याच आरोपीला पक्षात घेतल्याने, “भाजप म्हणजे हिंदुत्वाला लागलेला ‘खोडकिडा’ असून पालघरचे मृत साधू भाजपला शापच देतील,” अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. “हा प्रकार राजकीय स्वार्थासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचे उदाहरण आहे.” सर्वत्र बोंबाबोंब झाल्यानंतर चौधरी यांच्या भाजप प्रवेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी, भाजपची बेअब्रू झाल्याचे ‘सामना’ने म्हटले आहे.

vivek

Recent Posts