Nitin Bipin : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड! 45 व्या वर्षी ‘राष्ट्रीय सारथ्य’; आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत स्वीकारणार पदभार

Nitin Nabin BJP President : बिहारच्या बांकीपूरचे आमदार आता राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी; सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नवा इतिहास; जे.पी. नड्डा यांची घेणार जागा
नवी दिल्ली l भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन यांची पक्षाच्या १२ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी (19 जानेवारी) पार पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत केवळ नितीन नबीन यांचाच एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली. आज, मंगळवारी (20 जानेवारी 2026) सकाळी 11.30 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ते आपला पदभार स्वीकारतील. Nitin Nabin BJP President


वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणारे नितीन नबीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. पक्षाने त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला संधी देत एक मोठी ‘जनरेशनल शिफ्ट’ (पिढीबदल) केल्याचे मानले जात आहे. नबीन यांच्या उमेदवारीला पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि 30 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या बाजूने अर्जांचे 37 संच दाखल करण्यात आले होते, जे छाननीनंतर वैध ठरले.
नितीन नबीन हे बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिले असून, त्यांनी बिहार सरकारमध्ये पथ निर्माण आणि नगर विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी छत्तीसगडचे प्रभारी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजप आता आगामी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील विधानसभा निवडणुकांसाठी नव्या ऊर्जेने सज्ज होणार आहे. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नबीन यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली असून, 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतची रणनीती आखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.



