देश-विदेशमुंबई
Trending

Samna Article : आपच्या दारूण पराभव नंतर सामना वृत्तपत्रातून इंडिया आघाडीला खडेबोल

Samana Article On Delhi Election : दिल्ली आप आणि काँग्रेस दोघे एकमेकांना संपवायला निघाले, मोदी आणि शहांचे फावले… सामनावृत्तपत्र

मुंबई :- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या Delhi Vidhan Sabha आपच्यापराभव नंतर सामना वृत्तपत्रातून Samna Article इंडिया आघाडीला India Aghadi खडेबोल सुनावले आहे.दिल्लीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले. हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला? मनसोक्त भांडा ! महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर हुकूमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्य पदरी पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाचीही गरज पडणार नाही.

सामना वृत्तपत्र अग्रलेख जशास तसा!

अण्णा, ओमर आणि अमृतकाल

भांडा मनसोक्त !

दिल्ली बल्ली विधानसभेत स्वतः अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. 70 आमदारांची संख्या असलेल्या विधानसभेत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 22 जागा, तर भाजपने 48 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेसला प्रथेप्रमाणे भोपळाही फोडता आला नाही. 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीत विजय मिळाला. केजरीवाल यांच्यासह आपचे संपूर्ण मंत्रिमंडळ पराभूत झाले. अपवाद फक्त मावळत्या मुख्यमंत्री आतिशी व गोपाल राय यांचा. केजरीवाल यांनी राजकारणात जेथून सुरुवात केली तेथेच ते पुन्हा पोहोचले आहेत. केजरीवाल यांच्या पराभवावर आणि भाजपच्या विजयावर विश्लेषणाचा वर्षाव सुरू आहे, पण जग जिंकल्याच्या थाटात मोदी व त्यांच्या लोकांनी दिल्लीचा विजयोत्सव साजरा केला. दिल्लीतील निकालासंदर्भात दोन प्रतिक्रिया लक्षवेधी आहेत. पहिली जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची व दुसरी अण्णा हजारे यांची. राळेगणच्या अण्णा हजारे यांना महात्मा अण्णा बनविण्यात केजरीवाल व त्यांच्या लोकांचा मोठा वाटा आहे. अण्णा देशाला माहीत झाले ते केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभ्या केलेल्या राष्ट्रीय आंदोलनामुळे. हजारे यांना दिल्ली दाखवली ती केजरीवाल-सिसोदिया यांनी व त्याच दिल्लीचा पुढे राजकीय ताबा केजरीवाल यांनी घेतला. केजरीवाल यांनी किमान दहा वर्षे पंतप्रधान मोदी यांना दिल्लीच्या मैदानावर झुंजवले व शहा-मोदींच्या राजकारणाचा पराभव केला. आता अखेर अनेक उपद्व्याप करून मोदी-शहांना विजय मिळवता आला. केजरीवाल व आम आदमी पक्षाचा पराभव झाला याचा आनंद अण्णा हजारे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. अण्णा म्हणतात, “अरविंद केजरीवालांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नाही. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले.

” अण्णा हजारे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. अण्णांनी केलेल्या आमरण उपोषणातून जो अग्नी निर्माण झाला त्या ज्वालेतून केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा उदय झाला व आता त्याच हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी “केजरीवाल यांना जनतेने अजिबात मतदान करू नये,” असे आवाहन केले होते. जंतर मंतर, रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी कठोर आत्मक्लेश केले व अण्णांच्या आंदोलनामुळे तेव्हाचे काँग्रेसप्रणीत सरकार हादरले. मोदी व त्यांचे लोक सत्तेवर येण्यात अण्णांच्या आंदोलनाचा वाटा होता, पण जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले? अण्णांचे आंदोलन हे जनतेला माहितीचा अधिकार मिळावा, भ्रष्टाचाऱ्यांना शासन मिळावे व राज्यकारभार पारदर्शक व्हावा यासाठी होते. यापैकी एक तरी गोष्ट मोदी राज्यात घडपणे चालली आहे काय? माहितीचा अधिकार दडपलाच गेला. निवडणुका, भ्रष्टाचार याबाबत जनतेने माहिती मागितली तर त्यांचे अर्ज केराच्या टोपलीत फेकतात. आपण केलेले मतदान नक्की कोठे गेले हे जाणून घ्यायचा अधिकार उद्ध्वस्त केला गेला आहे आणि यावर अण्णा हजारे काहीच बोलत नाहीत. भ्रष्टाचाराविषयी तर बोलायलाच नको. खोटेपणा, अहंकार, अराजकता, कपट आणि भ्रष्टाचाराचे शीशमहल उद्ध्वस्त केल्याचे मत गृहमंत्री अमित शहांनी मांडले. ते विधान गमतीचे आहे. हे सर्व दुर्गुण सगळ्यात जास्त भाजपच्या धमन्यांत भरले आहेत. कपट आणि भ्रष्टाचाराच्या कुबड्यांवर मोदींचा अमृतकाल टिकून आहे कुबड्यावर व हजारे फक्त केजरीवाल यांच्या नावाने टोपीवर हात फिरवीत बसले आहेत. महाराष्ट्रात व देशभरात सर्व ‘दस नंबरी’ भ्रष्टाचारी एकत्र करून मोदी-शहा त्यांचे राज्य चालवत आहेत. मोदी राज्यात देश लुटणाऱ्यांना अभय
आहे,

भ्रष्ट पैशांच्या ताकदीवर घाऊक पक्षांतरेही सुरू आहेत हे काय अण्णा हजारे यांना दिसत नाही? राफेलपासून हिंडेनबर्गपर्यंत अनेक घोटाळे समोर येऊनही अण्णा हजारे यांनी सुस्कारा सोडला नाही. जणू काही मोदी राज्यात विचार, चारित्र्याचा पूरच आला आहे व त्या पुरात महाराष्ट्रात ठाकरे यांचे आणि दिल्लीत केजरीवालांचे राज्य वाहून गेले. माणसाने ढोंग तरी किती करावे? त्या मानाने ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलेला संताप हा व्यावहारिक आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकमेकांविरुद्ध फक्त लढलेच नाहीत, तर वाभाडे काढले. त्यामुळे भाजपचे काम या दोघांनी सोपे केले. “आपापसात मनसोक्तपणे भांडा आणि एकमेकांना संपवून टाका,” असा संताप ओमर यांनी व्यक्त केला तो योग्यच आहे. काँग्रेसने 14 ठिकाणी ‘आप’च्या पराभवास हातभार लावला. हरयाणातदेखील तेच झाले. ‘आप’शी भांडून शेवटी काँग्रेसच्या हाती काय लागले? काँग्रेस पक्षात अशा काही सुप्त शक्ती आहेत काय, ज्यांना राहुल गांधींच्या प्रतिष्ठेला नेहमीच तडे द्यायचे आहेत? ‘आप’ला विजयी करण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही असे काँग्रेसचे नेते म्हणत असतील तर ते चूक आहे व हा एक प्रकारचा अहंकार आहे. मग काय मोदी-शहांच्या हुकूमशाहीला विजयी करण्याची जबाबदारी ही आपापसात लढणाऱ्यांची आहे? दिल्लीतील निकालाचा फटका लोकशाहीला बसणार आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले. दिल्लीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले. हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला? मनसोक्त भांडा! महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर हुकूमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्य पदरी पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाचीही गरज पडणार नाही!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0