छत्रपती संभाजी नगर

Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये जलील यांच्यावर ‘अंडीफेक’; राजकीय वातावरण तापले, मंत्री सावे आणि शिरसाटांवर गंभीर आरोप!

Sambhaji Nagar Latest Political News : “हल्लेखोरांना मंत्र्यांचे आर्थिक पाठबळ”; जलील यांच्या आरोपानंतर शिरसाटांचा पलटवार- “हे तर कर्माचे फळ”.

छत्रपती संभाजीनगर | एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर बुधवारी दुपारी सलीमनगर भागात अंडी फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर शहरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, जलील यांनी थेट कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यावर हल्लेखोरांना रसद पुरवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

नेमकी घटना आणि आरोप

बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास संजयनगरजवळील पाण्याच्या टाकीजवळ जलील यांचे वाहन आले असता, काही तरुणांनी त्यांच्यावर अंडी फेकून हल्ला केला. यावेळी जमावाने जलील यांना गाडीबाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले, “हल्ला करणारा कलीम कुरेशी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो बनावट डिझेल आणि गुटखा तस्करीमध्ये गुंतलेला आहे. या गुंडांना पैसा पुरवण्याचे काम मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट करत आहेत. या नेत्यांच्या संभाषणाच्या ध्वनीफिती माझ्याकडे उपलब्ध आहेत.”

संजय शिरसाट आणि अतुल सावे यांचा पलटवार

जलील यांच्या आरोपांना उत्तर देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, “स्वतःला ‘शेर’ म्हणवून घेणारा माणूस आज पळून गेला आहे. हे त्यांच्याच कर्माचे पाप असून त्याचे फळ त्यांना मिळत आहे.” तर मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “माझा या हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. जलील यांनी उमेदवारी वाटपात लोकांकडून पैसे घेतले आहेत, त्यामुळे त्यांचेच माजी नगरसेवक त्यांच्यावर नाराज होऊन हल्ले करत आहेत.”

सहानुभूतीसाठी ‘स्टंट’?

दुसरीकडे, जलील यांच्या विरोधी गटाने हा हल्ला म्हणजे सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे म्हटले आहे. तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या नाराजीमुळेच हा राडा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पोलीस आयुक्तांकडे धाव

हल्ल्याच्या वेळी जलील कारच्या पुढच्या सीटवर बसले होते. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या एका सहकाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ एमआयएम समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago