मुंबई
Trending

Samana Lekh : भाजपाचे लंगोट सुटला.. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

Samana Lekh Target BJP : भारत न्याय जोडो यात्रा… याचे विराट स्वरूप पाहून भाजपाचे लंगोट सुटले असा अग्रलेख सामनाच्या वृत्तपत्रातून लिहिण्यात आले आहे.

मुंबई :- राहुल गांधी Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्रा मणिपुरातून सुरू झाली ती मुंबईत पोहोचली. मुंबईने राहुल गांधींचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तेव्हा इंदिरा गांधी यांचे स्वागतच केले होते, पण तेव्हा भाजप व बावनकुळ्यांचा जन्म व्हायचा होता. राहुल गांधी यांनी देशातले वातावरण नक्कीच जिवंत केले आहे. मुंबईत त्यांनी बहार आणली. इंडिया आघाडीने मुंबईत युद्धाचा शंख फुंकला. भाजपने काँग्रेसचाच लंगोट बांधला असल्याने शंख फुंकताच त्यांचा लंगोट सुटला. त्याचे आता काय करायचे? दिवा विझता विझता मोठा होतो तसे भाजपचे झाले आहे. भाजपने स्वतःच्या काँग्रेजी लंगोटाची काळजी घ्यावी. नसत्या उठाठेवी करू नयेत. अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर करण्यात आली आहे.

सामनाचा अग्रलेख जशास तसा

भाजपचा लंगोट सुटला!

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील धारावीत झाला. भारत त्या निमित्ताने राहुल गांधींचे मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन झाले. त्या शक्ती प्रदर्शनाने भाजप व त्यांच्या गुलाम गटांची बुबुळे बाहेर आली. रविवारी शिवतीर्थावर ‘इंडिया’ आघाडीची विराट सभाही पार पडल्याने लोकसभा प्रचाराचे रणशिंग मुंबईतच फुंकले गेले. सभेत देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहिले. देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून व खासकरून मुंबईतून झाली हे महत्त्वाचे. मुंबईतून १९४२ साली ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा दिला होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात लाखांच्या संख्येने जनसमुदाय जमला होता व स्वातंत्र्यापूर्वीच्या शेवटच्या सर्वात मोठ्या लढ्याची म्हणजे ‘चले जाव’ची घोषणा तेथे झाली. रविवारी शिवतीर्थावरून साधारण त्याच प्रकारची गर्जना झाली. ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर हुकूमशाही देशातील मोदी राजवटीत सुरू आहे व त्यांना ‘चले जाव’चा इशारा देणारी सभा मुंबईत पार पडली. याच सभेत ‘अबकी बार, भाजप तडीपार’ अशी बुलंद हाक देण्यात आली. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी या वेळी जोरदार भाषणे केली. जनतेतही या सभेने ऊर्जेचा संचार झाला. त्याचा परिणाम असा झाला की, मोदी म्हणतात, या वेळी ३७० जिंकू, पण अमित शहांनी आता सांगितले ३०० जिंकू. म्हणजे मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या ७० जागा कमी केल्या. जसजसे ‘इंडिया’चे वादळ घोंघावत जाईल तसे तसे भाजपचे आकडे घसरत जातील. राहुल गांधी म्हणजेच काँग्रेससोबत शिवतीर्थावर झालेल्या सभेच्या ‘न्याय मंचा’वर

उद्धव ठाकरे उपस्थित राहिले म्हणून भाजप व त्यांच्या गुलाम गटांत पोटाचे विकार सुरू झाले. ठाकरे यांना काँग्रेसबरोबर मंचावर जाणे वगैरे शोभते काय? अशी बकवास त्यांनी केली. ज्या भाजपने स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट बांधले आहे त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या मंचावर गेली याबद्दल दुःख व्यक्त करावे हे आक्रित आहे. मुळात भाजपने स्वतःची ‘काँग्रेस’ करून घेतली आहे. भाजपने स्वतःचा चेहरा व अस्तित्व गमावले आहे. भाजपमध्ये इतके काँग्रेसवाले घुसले आहेत की, त्या सर्व काँग्रेसवाल्यांनी ठरवले तर भाजपचे दुकान एका रात्रीत बंद पडेल. पुन्हा सर्व कलंकित चेहऱ्यांना सध्या भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुऊन ‘स्वच्छ’ वगैरे केले जात आहे आणि या सर्वांना भाजपची दारे सताड उघडी केली जात आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपने अशा मंडळींपुढे शरणागतीच पत्करली आहे. स्वातंत्र्य काळात याच लोकांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करली होती व मानमरातब मिळवले होते. काही जण जेव्हा ब्रिटिशांचे ‘मुखबीर’ म्हणून, खबरे म्हणून काम करीत होते तेव्हा काँग्रेस स्वातंत्र्यलढ्यात संघर्ष करीत होती. आज देशावर व महाराष्ट्रात त्याच खबऱ्यांचे म्हणजे बेइमानांचे राज्य आहे. शिवसेना काँग्रेसबरोबर म्हणजे महाविकास आघाडीत व इंडिया गटात आहे, पण भाजपच्या बेइमान राजकारणानेच शिवसेनेला ही वाट स्वीकारावी लागली. भाजप हा आज भ्रष्टाचारी व बेइमानांचा कळप बनला आहे. त्या भ्रष्ट कळपातून शिवसेना बाहेर पडली हे बरेच झाले व शिवसेनेचे दोन भाग करूनही मूळ शिवसेना जास्त वेगाने पुढे जात आहे. काँग्रेसने शिवसेनेशी बेइमानी केली नाही, तर २५ वर्षे एकत्र असलेल्या भाजपने शिवसेनेबरोबर बेइमानी केली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळ्यांनी उगाच गोटेमारी करू नये. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे शिवसेनाप्रमुखांचे वक्तव्य होते व त्याची आठवण बावनकुळे करून देत आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील तेव्हाची बजबजपुरी शिवसेनेत येऊ देणार नाही हा शिवसेनाप्रमुखांच्या त्या म्हणण्याचा अर्थ होता, पण आज भाजपने स्वतःची ‘काँग्रेस’ करून घेतली आहे, त्याचे काय? कमळाबाईने भ्रष्टाचाराची साथ स्वीकारली व‌ शिवसेना त्या बजबजपुरीतून बाहेर पडली. आता ही बजबजपुरी लोकांना कायमची संपवायची आहे. राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांची भीती भाजपला वाटणे स्वाभाविक आहे. दोन्ही नेत्यांना उदंड जनसमर्थन मिळते आहे. त्यांना भाड्याने माणसे आणून गर्दी जमवावी लागत नाही. पंतप्रधान मोदी हे हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत, पण राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मणिपुरातून सुरू झाली ती मुंबईत पोहोचली. मुंबईने राहुल गांधींचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तेव्हा इंदिरा गांधी यांचे स्वागतच केले होते, पण तेव्हा भाजप व बावनकुळ्यांचा जन्म व्हायचा होता. राहुल गांधी यांनी देशातले वातावरण नक्कीच जिवंत केले आहे. मुंबईत त्यांनी बहार आणली. इंडिया आघाडीने मुंबईत युद्धाचा शंख फुंकला. भाजपने काँग्रेसचाच लंगोट बांधला असल्याने शंख फुंकताच त्यांचा लंगोट सुटला. त्याचे आता काय‌ करायचे? दिवा विझता विझता मोठा होतो तसे भाजपचे झाले आहे. भाजपने स्वतःच्या काँग्रेजी लंगोटाची काळजी घ्यावी.नसत्या उठाठेवी करू नयेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0