Samana Agralekh : ऐसे संत जाते कळी। तोंडी तमाखूची नळी।। स्नानसंध्या बुडविली।….. सामनाचा अग्रलेख
•सामनाच्या अग्रलेखातून प्रयागराज येथील महाकुंभमेळाच्या व्यवस्थापकावरून प्रश्नचिन्ह, सरकारवर टीका
मुंबई :- ऐसे संत जाते कळी। तोंडी तमाखूची नळी।। स्नानसंध्या बुडविली। पुढे भांग वोडवली ।। भांग भुको, हे साधन। पची पडे मद्यपान।। तुका म्हणे अवघे सोंग। तेथे कैचा पांडुरंग।। असे चारोळी मांडत सामनाच्याअग्रलेखातून मोदी सरकार आणि योगी सरकार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. प्रयागराज येथे महा कुंभ सुरू झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने धर्मसोळ्याचे जोरदार मार्केटिंग केल्याची गंभीर टीका सामनाच्या वृत्तपत्रातून करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी दहा हजार कोटीचा खर्च झाल्याचा सांगण्यात आले आहे परंतु यामध्ये सामान्य लोकांना कोणत्याही सुख सुविधा नसल्याचा आरोप सामनाच्या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.
सामनाचा अग्रलेख जशास तशा
सामाजिक सुधारणांची गरज !
प्रयागराज येथे महाकुंभ सुरू झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने या धर्मसोहळ्याचे जोरदार मार्केटिंग सुरू केले. यापूर्वी कधी कुंभ सोहळा झाला नव्हता व यापुढे होणार नाही, मोदी वगैरे आहेत म्हणून १४४ वर्षांनी हा योग आला, नाहीतर शक्यच नव्हते असा त्यांचा सूर आहे. कुंभ सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून दहा हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले, पण कुंभस्नानासाठी आलेले सामान्य लोक उघड्यावरच झोपले आहेत, कुडकुडत बसले आहेत. कारण सर्व व्यवस्था व्हीआयपींसाठी आहे. काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कुंभस्नानासाठी पोहोचले. गंगेत डुबकी मारली व संरक्षणमंत्र्यांना सुरक्षित डुबकी मारता यावी यासाठी ‘घाट’ पूर्णपणे बंद करून ठेवला. त्यामुळे साधू, संत, संन्यासी, जनता यांचे हाल झाले. संरक्षणमंत्र्यांनी ‘डुबकी’ मारल्याने लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य मागे हटेल व भारताची गिळलेली जमीन चीन मोकळी करेल अशी आशा आहे. मागे एकदा अशाच सोहळ्यात प्रयागतीर्थी पंतप्रधान मोदी यांनी दलितांचे पाय धुतले होते व त्याचा सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे दलितांच्या जीवनात कोणताच फरक पडला नाही. उलट देशभरात दलितांवरील अत्याचारांत वाढ झाली. कुंभ सोहळा पवित्र आहे व वर्षानुवर्षे तो सुरूच आहे. याआधी कुंभ आयोजनाचे कधी राजकारण किंवा श्रेयवाद झाला नव्हता. तो आता सुरू आहे. कुंभस्नानासाठी विसेक कोटी भाविक येतील असे सांगितले जात आहे. हा आकडा फसवा आहे असे अखिलेश यादव म्हणतात. इकडे भारतात ‘कुंभ’ उत्सव सुरू असताना तिकडे चीनने व्यापार-उद्योगात मोठी झेप घेतल्याचे समोर आले. या काळात चीनने त्यांचा जागतिक व्यापार, निर्यात आठ टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे तेथील व्यापार, रोजगारात चमक निर्माण झाली. आपण विज्ञान, ज्ञानाचा मार्ग सोडून कुंभात दंग आहोत. भारताचे व्यापार, संरक्षण, उद्योग, रोजगार मंत्री स्नानासाठी घाटावर रांगेत उभे आहेत. कुंभाचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी तेथे घडत आहेत. अनेक सुंदऱ्या वेशभूषा करून आपण
साध्वी असल्याचे नाट्य
वठवीत आहेत व त्यांच्या मॉडेलिंगचे बिंग उघडे पडत आहे. कोणीही • येतो व स्वतःला साधू, साध्वी व संत, संन्यासी म्हणून घोषित करतो. मीडिया त्यांना प्रसिद्धी देतो. सर्वसंगपरित्याग करून लोक कसे अध्यात्माकडे वळत आहेत याचे मार्केटिंग भाजपचा आयटी सेल करीत आहे. अभय सिंग ऊर्फ आयआयटी बाबा या काळात गाजला, पण हा उच्चशिक्षित तरुण नशेच्या आहारी गेल्याने त्या नशेत भलतेच ज्ञान पाजळीत होता. गांजा, चिलीम मारून बेबंद नाचताना त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले. त्यामुळे हिंदुत्वाची बदनामीच झाली. हा अभय सिंग ऊर्फ आयआयटी बाबा आता कुंभातून गायब झाला. भाजपचे हे असे आदर्श हिंदुत्ववादी असतील तर सगळाच आनंद आहे. मेंदूला हानी पोहोचवणारे गांजा सेवन करणारे अध्यात्माचे पुजारी कसे होऊ शकतात? अध्यात्माच्या नावावर अशा नशेबाजीला कोठेच स्थान असता कामा नये. आमच्या वारकरी संप्रदायाची लाखोंची दिंडी म्हणजे पवित्र कुंभच आहे, पण त्या दिंडीत अशा फालतू नशेबाज गोष्टी खपवून घेतल्या जात नाहीत. संत तुकाराम महाराजांनी परखडपणे सांगितले आहे,
ऐसे संत जाते कळी। तोंडी तमाखूची नळी।। स्नानसंध्या बुडविली। पुढे भांग वोडवली ।। भांग भुको, हे साधन। पची पडे मद्यपान।। तुका म्हणे अवघे सोंग। तेथे कैचा पांडुरंग।।
कुंभात अनेक प्रताप व प्रमाद घडत आहेत. यानिमित्तानेही इतर धर्मीयांना बदनाम करण्याचे प्रयोग झाले. कुणा हिंदू पोराने मुसलमान नाव घेऊन कुंभात घातपात घडवण्याच्या धमक्या दिल्या, तर कुणी हिंदू युवक नकली शेख बनून कुंभमध्ये ‘प्रॅक’ करीत होता. नागा साधूंच्या
अघोरीपणाचेही प्रदर्शन
झा ले. नागा साधू स्मशानात अघोरी साधना करतात. ते गळ्यात मानवी कवट्या, हाडे घालून कुंभात फिरतात. मनुष्यांची हाडे खाऊन अघोरी साधना करीत असल्याचे त्या ‘आयआयटी’ बाबाने सांगितले. भारताच्या तरुण पिढीसाठी हा आदर्शवाद ठरवायचा काय? ज्ञान, विज्ञान की स्मशानातला हा अघोरीवाद, याचा निर्णय घेण्याची ही वेळ आहे. स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी, असा वाद तेव्हा लोकमान्य टिळक व आगरकरांत झाला. कारण लोक अशा रूढी, परंपरा, अघोरी क्रियाकर्मात अडकून पडले व हाच आपला हिंदू धर्म अशी त्यांची अंधश्रद्धा होती. त्या अघोरी परंपरांतून बाहेर काढून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्यांना बाहेर काढणे सोपे नव्हते. या सगळ्या अघोरीपणातून जनतेला बाहेर काढले व देशात प्रगती केली, पण मोदी काळात जनतेला पुन्हा धार्मिक भांगेच्या नशेची चिलीम पाजून अविज्ञानवादी, ढोंगी, बुरसटलेल्या व अघोरी अध्यात्मवादाकडे ढकलले जात आहे. जे शिकले आहेत त्यांनी त्याग करून नशेबाज आयआयटी बाबाप्रमाणे चिलीम मारत फिरावे. म्हणजे महागाई, रोजगार या प्रश्नांची शुद्धच उरणार नाही. मंत्र्यांनी ‘व्हीआयपी’ म्हणून शाही स्नानाच्या डुबक्या मारल्याने धुंद जनतेला चीनच्या आक्रमणाची फिकीर पडणार नाही. कुंभातील काही बनावट साधूंनी कोवळ्या मुलींना ‘नशा’ देऊन पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सहकार्याने या मुली त्यांच्या पालकांकडे सुखरूप पोहोचल्या ही गंगामाईचीच कृपा म्हणायची. कुंभ सोहळे यापूर्वी पार पडले. त्यातही जगातील लोक सहभागी झाले. हे पवित्र पर्व आहे, धर्मकार्य आहे. त्याचे पावित्र्य टिकले तरच आपला धर्म टिकेल. हिंदू धर्म संस्कारी आहे. अघोरी आणि भ्रष्ट नाही. गंगामाई सगळ्यांची आहे. म्हणूनच उस्ताद बिस्मिल्ला खानांची शहनाई गंगामाईस प्रसन्न करीत राहिली. आज गंगेसही अघोरी व संकुचित बनवण्याचा प्रयोग सुरू आहे, हे बरे नाही. सामाजिक सुधारणांची आज खरी गरज आहे !