मुंबई

Samana Agralekh : सरसंघचालक त्याच अहंकारावर बौद्धिक घेतले, सामना वृत्तपत्रातून पुन्हा एकदा निशाणा साधला

•सरसंघचालकांचे बौद्धिक पण उपयोग होईल काय?,सामना अग्रलेखातून आरएसएस आणि मोदींवर पुन्हा एकदा निशाणा

मुंबई :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मणिपूर बद्दल केलेल्या विधानावर आता शिवसेनेच्या मुखपत्रा असलेल्या सामना वृत्तपत्रातून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.गेल्या दहा वर्षांत मोदी-शहांनी संघाचा विचार, संघाचे पालकत्व, नैतिकतेचे डोस झिडकारून दिले. गर्वाची व अहंकाराची लागण त्यांना झाली. लोकसेवकास अहंकाराची बाधा झाली की, ती जालीम विषबाधेपेक्षा भयंकर असते. मोदी हे स्वतःचा उल्लेख प्रधान सेवक, चौकीदार वगैरे करीत. हे ढोंग ठरले. त्यांची वृत्ती अहंकारी बादशहा किंवा शहेनशहाप्रमाणेच होती व त्या अहंकाराच्या तडाख्यात भाजपची मातृसंस्था ‘संघ परिवार ‘ही सापडला. सरसंघचालकांनी त्याच अहंकारावर बौद्धिक घेतले, पण काही उपयोग होईल काय?

सरसंघचालकांचे बौद्धिक !‌…पण उपयोग होईल काय?… सामना वृत्तपत्राचा अग्रलेख जशास तसा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपचे बौद्धिक घेतले, पण अशी बौद्धिके घेऊन भाजपचे सध्याचे चारित्र्य बदलणार आहे काय? मोदी-शहा यांच्या हातात जोपर्यंत भाजपची सूत्रे आहेत तोपर्यंत सरसंघचालकांची बौद्धिके म्हणजे उपड्या घड्यावर पाणीच ठरणार आहेत. भागवत यांनी लोकसेवकाच्या भूमिकेबाबत आपली मते मांडली आहेत. लोकसेवकांनी अहंकारापासून दूर राहावे असा सल्ला दिला आहे. आता हे लोकसेवक कोण? लोकसेवेच्या नावाखाली अहंकार जोपासणारे कोण? संघ भाजपची मातृसंस्था आहे. भाजपला सध्याच्या स्थानी पोहोचविण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी अपार मेहनत घेतली. जेथे भाजप पोहोचला नाही तेथे संघ पोहोचला. झारखंड, छत्तीसगढ, ईशान्येकडील दुर्गम राज्यांत भाजप रुजला व यश मिळाले ते संघ स्वयंसेवकांनी या दुर्गम भागात केलेल्या अपार कष्टांमुळेच. अरुणाचल, मणिपूर, मेघालय, नागालॅण्ड, आसाम अशा राज्यांत संघाने काम केले. झारखंड, छत्तीसगढच्या वनवासी भागात संघ आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्यातील भाजपचे शंभर टक्के यश हे संघाच्या बांधणीचे आहे, पण गेल्या दहा वर्षांत मोदी-शहा यांनी संघाचा वापर हा राजकीय फायद्यासाठीच करून घेतला. संघ म्हणजे ‘वापरा आणि फेका’ या पद्धतीचा असल्याचे या व्यापारी जोडीने दाखवून दिले. संघाची आम्हाला गरज नाही, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केले. हे वक्तव्य करण्याची प्रेरणा त्यांना मोदी-शहांकडून मिळाली. अन्यथा डॉ. नड्डा यांची असे वक्तव्य करण्याची हिंमत नाही. भाजपने गेल्या दहा वर्षांत आपल्या चारित्र्याला डाग लावून घेतले आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण कौरवांनी केले, पण भाजपचे वस्त्रहरण गुजरातच्या दुर्योधनांनी केले व कधीकाळी हे गुजरातचे दुर्योधनही संधा घाचे विनम्र स्वयंसेवक होते. मोदी-शहांच्या काळात संघाचे अधःपतन करण्यात आले. संघाच्या काही प्रमुख लोकांना सर्वच बाबतीत भ्रष्ट करून त्यांना तत्त्व-नीतीपासून फारकत घ्यायला लावली. संघाचे लोकही पैशांच्या व्यवहारात व ठेकेदारीत सहभागी करून घेतले. जम्मू-कश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका ३०० कोटींच्या ठेक्यासाठी संघाचे एक नेते कसे दबाव आणत होते याचा खुलासा केला. राज्यपाल मलिक यांनाच मोठी लाच देऊन हे टेंडर मिळविण्याचा प्रयत्न या संघ नेत्याने केल्याचे उघड झाले. संघाचे व्यापारीकरण करून आपल्या चरणाशी बसवण्याचा हा डाव होता व आहे. सरसंघचालकांनी खंत व्यक्त केली ती त्याचमुळे. २०२४ ची निवडणूक हा मोदी-शहांचा अहंकार होता. आम्ही जिंकूच. संघ नको, योगी नको, कोणी नको असा त्यांचा अहंकार होता. त्या अहंकाराचा फुगा फुटला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरचा संवाद व युती तुटू नये, अशी संघ नेतृत्वाची भूमिका होती. शिवसेना हा मूळ हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप व शिवसेना एकत्र आले. ही युती तोडू नये या भूमिकेत संघाचे नेतृत्व होते, पण मोदी-शहांचा अहंकार व व्यापारी वृत्ती यामुळे संघाचे न ऐकता शिवसेनेशी युती तोडण्यात आली. पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला. संघातही मोदी-शहांनी चमचे मंडळ निर्माण केल्याने या मनमानीस कोणी विरोध केला नाही. मोदी हेच हिंदुत्वाचा बॅण्ड व शिल्पकार असल्याचे ढोल वाजवून संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेलाच आव्हान दिले. मोदी यांनी 370 कलम रद्द करण्याचा राजकीय पराक्रम केला, पण कश्मीरात
आजही अशांतता

व कश्मिरी पंडितांचे हाल तसेच आहेत. कश्मिरी आहे व पंडितांबाबत मोदींनी दिलेली वचने पाळली नाहीत. संघाचा येथे आक्षेप आहे. मणिपूरच्या हिंसाचाराच्या बाबतीत मोदी-शहांनी पळपुटेपणाची भूमिका घेतली हे काही संघाच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. भाजपच्या विजयासाठी यापूर्वी संघाचे कार्यकर्ते मेहनत घेत असत. या वेळी संघाचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारापासून लांब राहिले. मोदी व शहा यांनी उत्तर प्रदेशात योगींचा, राजस्थानात वसुंधराराजे व मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचा पाणउतारा केला. महाराष्ट्रात नितीन गडकरी हेसुद्धा संघाचे तितकेच प्रिय. गडकरी यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्याचा विचार होताच, पण भाजप २४० वरच लटकल्याने नाइलाजाने त्यांना गडकरींना मंत्रिमंडळात घ्यावे लागले. राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या दानातून व श्रमातून जनसंघ व भाजपची बीजे अंकुरली. मात्र त्यांचा वारसा चालविणाऱ्या वसुंधराराजे शिंदे यांना पूर्णपणे बाजूला सारण्यात आले. एकेकाळी सरसंघचालक व संघाचे पदाधिकारी हे भाजपशासित मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या कामाची झाडाझडती घेत असत व भाजपचे नेतृत्व संघाचे हे पालकत्व मान्य करीत असे. गेल्या दहा वर्षांत मोदी-शहांनी संघाचा विचार, संघाचे पालकत्व, नैतिकतेचे डोस झिडकारून दिले. गर्वाची व अहंकाराची लागण त्यांना झाली. लोकसेवकास अहंकाराची बाधा झाली की, ती जालीम विषबाधेपेक्षा भयंकर असते. मोदी हे स्वतःचा उल्लेख प्रधान सेवक, चौकीदार वगैरे करीत. हे ढोंग ठरले. त्यांची वृत्ती अहंकारी बादशहा किंवा शहेनशहाप्रमाणेच होती व त्या अहंकाराच्या तडाख्यात भाजपची मातृसंस्था ‘संघ परिवार’ ही सापडला. सरसंघचालकांनी त्याच अहंकारावर बौद्धिक घेतले, पण काही उपयोग होईल काय?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0