मुंबई

Samana Agralekh : कर भला तो हो भला… ही मोदीची वृत्ती नाही सामनाच्या अग्रलेखातून मोदीसह राज्यातील नेत्यांवर टीका

•देशात मोदी 3.0 सरकार स्थापन झाले, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, या घडामोडीवर सामनाच्या वृत्तपत्रातून मोदींवर जोरदार टीका

मुंबई :- नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. देशात मोदी 3.0 सरकार स्थापन झाले असून काल एकूण 72 मंत्रासह नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आजच्या सामना वृत्तपत्रातून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कारण ते स्वतः त्याच विचारांचे आहेत. मोदी-शहा यांनी सत्तेचा वापर देशातील आनंद, उत्साह, विकास मारण्यासाठी केला. लोकांना मूर्ख, अंधभक्त बनवून राज्य करणे व त्यासाठी टाळ्या थाळ्या वाजवणे हे नकारात्मकतेचे लक्षण आहे. कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे. कामाख्या देवीस रेड्याचा बळी दिला जातो तसा आपला बळी जाईल काय? या भयाने सगळेच पछाडले आहेत. कारण देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व सुरू झाले. ग्रहण लागल्यावर जी उदासीनता येते तसेच वातावरण आहे. थोडे थांबायला हवे.

सामना वृत्तपत्रातील अग्रलेख जशास तसा

पुन्हा नकारात्मक ऊर्जा !

बहुमत गमावलेल्या भाजपने ‘एनडीए’चा पिसारा लावून सत्ता स्थापन केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ रविवारी संध्याकाळी घेतली. हे सरकार मोदींचे नसून आता ‘रालोआ’ म्हणजे एनडीएचे आहे, असे मोदी वारंवार आपल्या भाषणातून सांगत आहेत. नितीश कुमार व चंद्राबाबू यांना खूश करण्याची व मिठ्या मारण्याची एकही संधी मोदी यांनी गेल्या सात दिवसांत सोडली नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले व त्यांच्याबरोबर भाजप आणि घटक पक्षांतील काही सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनहरलाल खट्टर, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे अशी नेहमीची नावे आहेत. शिंदे गटाचे प्रताप जाधव यांचे घोडे गंगेत न्हाले. रामदास आठवले हे आहेतच. महाराष्ट्रातून रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली. खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने दिलेली चपराक आहे व त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतलेले दिसतात. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. ते या वेळी घडले नाही. नारायण राणे, भागवत कऱ्हाड यांना मंत्रिमंडळातून नारळ दिला आहे. तेलुगू देसम व जनता दल युनायटेडचे मंत्री समाविष्ट केले गेले आहेत, पण तेलुगू देसमच्या दोन मुख्य मागण्या आहेत. त्यात महत्त्वाची मागणी म्हणजे अमित शहा यांच्याकडे गृहखाते असता कामा नये व लोकसभेचे ‘स्पीकर’ पद तेलुगू देसमकडे असावे. या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी यांचे नाक व कान कापण्यासारख्याच आहेत. तेलुगू देसमला अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे की, सरकार स्थिरस्थावर झाल्यावर अमित शहा हे त्यांचा जुनाच खेळ

सु रू करतील व संसदेतला तेलुगू देसम पक्ष फोडतील. नितीश कुमार यांनाही तेच भय आहे. त्यामुळे लोकसभेच्या ‘स्पीकर’ पदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा नेता असावा, अशी मागणी जोर धरत आहे. याचा अर्थ नवे सरकार हे अविश्वासाच्या पायावर बनत आहे. मोदी हे रालोआच्या नेत्यांना मिठ्या मारण्याचे नाटक करीत असले तरी त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असेच नितीश व चंद्राबाबूंना वाटत आहे आणि हेच सरकारच्या अस्थिरतेवर शिक्कामोर्तब आहे. बहुमत गमावलेल्या मोदी यांनी शपथ सोहळ्याचा थाट मोठाच केला. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांनी शपथ घेतली. जणू काही ‘चारशेपार’चा नारा खरा करून ते शपथ घेत आहेत, असाच सगळा मामला होता. प्रत्यक्षात त्यांनी पराभूत मनाने शपथ घेतली हेच सत्य आहे. देशभरातून भाजपच्या कार्यकर्त्यांना गर्दी करण्यासाठी दिल्लीत बोलावले व माहौल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदी यांच्या समोर संसदेत या वेळी एक मजबूत विरोधी पक्ष आहे. मोदी यांच्या शपथ सोहळ्यावर ‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार टाकला व त्याबद्दल मोदींचे चमचे विरोधकांना लोकशाहीत संसद, परंपरा यांचे ज्ञान देत आहेत. यापैकी कोणत्या परंपरा मोदी यांनी पाळल्या ते आधी सांगा. मोदी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांचे दीडशे खासदार निलंबित करून रिकाम्या बाकांसमोर भाषणे ठोकण्याचा पराक्रम मोदी यांनी केला. संसदीय लोकशाहीचे कोणते संकेत मोदी किंवा त्यांच्या लोकांनी पाळले? मोदी यांची ‘रालोआ’च्या नेतेपदी निवड झाल्यावर त्यांनी जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात केलेल्या भाषणाने सगळ्यांचीच निराशा झाली. पहिल्याच भाषणात मोदी यांनी काँग्रेस व इंडिया आघाडीस
टीकेचे लक्ष्य केलेले. याची गरज नव्हती. जो माणूस स्वतः निवडणूक हरला आहे. वाराणसी मतदारसंघात कसाबसा विजय मिळाला. बहुमत गमावले तरी स्वतःचे झाकून दुसऱ्यांचे वाकून पाहण्याची त्यांची खोड काही जात नाही. मोदी हे देशाला दिशादर्शक असे काही बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. मोदी हे एक नकारात्मक विचारांचे व्यक्तिमत्त्व असून दिवसरात्र ते त्याच नकारात्मक विचारांच्या गुंत्यात वावरत असतात. त्यांच्या वाणीत व विचारात विष आहे आणि त्यामुळे देशात दहा वर्षांपासून नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली हे मान्य करावेच लागेल. मोदी व शहा यांना दुसऱ्याचे बरे झालेले पाहवत नाही. अशा नकारात्मक विचारांच्या व्यक्ती देश व समाजाचे कधीच कल्याण करू शकणार नाहीत. या नकारात्मक ऊर्जेचा प्रकोप गेल्या दहा वर्षांपासून देश भोगत आहे. नकारात्मक ऊर्जा ही देशात अस्वस्थता, भय, वाद, भांडणे घडवून आणते. नकारात्मक ऊर्जा लोकांची विचार करण्याची शक्ती मारते. त्यांना मूकबधिर बनवते. लोकांना उदास, आळशी व कडू बनवते. मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कारण ते स्वतः त्याच विचारांचे आहेत. मोदी-शहा यांनी सत्तेचा वापर देशातील आनंद, उत्साह, विकास मारण्यासाठी केला. लोकांना मूर्ख, अंधभक्त बनवून राज्य करणे व त्यासाठी टाळ्या थाळ्या वाजवणे हे नकारात्मकतेचे लक्षण आहे. कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे. कामाख्या देवीस रेड्याचा बळी दिला जातो तसा आपला बळी जाईल काय? या भयाने सगळेच पछाडले आहेत. कारण देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व सुरू झाले. ग्रहण लागल्यावर जी उदासीनता येते तसेच वातावरण आहे. थोडे थांबायला हवे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0