मुंबई

Samana Agralekh : महाराष्ट्रात ‘फडणवीस ॲक्ट (2025)’ लागू? कलंकित मंत्र्यांना ‘समज देऊन सुटका’ धोरणावरून ‘सामना’चा सरकारवर हल्लाबोल!

•मंत्रिमंडळात ‘शातीर अपराधी’ भरले; रमी खेळणारे, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले, पैसे खाणारे मंत्री मोकाट फिरणार?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या ‘कायद्याची’ चर्चा सुरू झाली आहे, ज्याला ‘सामना’ वृत्तपत्राने आपल्या आजच्या अग्रलेखातून उपरोधिकपणे ‘फडणवीस ॲक्ट (2025)’ असे संबोधले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ‘शातीर अपराधी’ भरलेले असूनही त्यांच्यावर कठोर कारवाई न करता ‘समज देऊन सुटका’ करण्याचे धोरण स्वीकारल्याचा घणाघात ‘सामना’ने केला आहे. हा ‘कायदा’ फक्त मंत्र्यांनाच लागू होतो का, असा संतप्त सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

अग्रलेखात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (विधानसभेत रमीचा डाव टाकणारे), सामाजिक न्यायमंत्री शिरसाट (घरात पैशांच्या बॅगा घेऊन बसलेले), संजय राठोड (बदली-बढत्यांत पैसे खाणारे), आणि डान्स बार चालवणारे योगेश कदम या मंत्र्यांच्या बेताल आणि अभिरुचीहीन वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मंत्र्यांचे वागणे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळे फासणारे असून, मंत्रीपदे म्हणजे पैसे जमवण्यासाठी उघडलेली दुकाने झाली आहेत का, असा सवालही विचारण्यात आला आहे. हे सर्व मंत्री जातील आणि सरकार स्वच्छ होईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना केवळ ‘समज देऊन सोडल्याची’ बातमी बाहेर आल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ‘कलंकित मंत्र्यांना’ फैलावर घेतले आणि नंतर समज देऊन सोडून दिले, म्हणजे ‘गुन्हेगारांवर कारवाई करायची नाही आणि राज्यात जे सुरू आहे ते तसेच सुरू ठेवायचे,’ अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

‘सामना’ने पुढे म्हटले आहे की, जर मंत्रिमंडळातील गुन्हेगारांना ‘समज’ देऊन सोडले जात असेल, तर हाच न्याय महाराष्ट्रातील पोलीस, जिल्हा सत्र न्यायालये आणि इतरांच्या बाबतीत का लावला जात नाही? पुण्याच्या खराडी येथे गिरीश महाजन पुरस्कृत पोलिसांनी खासगी पार्टीला ‘रेव्ह पार्टी’ घोषित करून लोकांना अटक केली, ज्यात एकनाथ खडसे यांचे जावईही होते. त्यांनाही ‘समज देऊन सोडण्याचा’ हा ‘फडणवीस कायदा’ लावता आला असता, पण मंत्रिमंडळातील अपराध्यांना एक न्याय आणि इतरांना दुसरा, हा दुजाभाव कसा, असा प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यात सध्या हनी ट्रॅपचा बोलबाला सुरू असून, मंत्रिमंडळातील चार मंत्री त्यात अडकल्याचा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे. या मंत्र्यांनादेखील बहुधा ‘समज देऊन सोडा’ याच धोरणाने मोकळे सोडलेले दिसते. “मंत्र्यांनी यापुढे कुठे कॅमेरे लावलेत काय, पाळत आहे काय हे पहा आणि मगच ‘हनी’च्या मार्गाने जा,” अशी ‘गोड समज’ मुख्यमंत्र्यांनी दिली असावी आणि सर्व प्रमुख हॉटेलांतील कॅमेरे व उपकरणे काढण्याच्या सूचना दिल्या असाव्यात, अशी उपरोधिक टिप्पणीही अग्रलेखात केली आहे. पोलीस मात्र गावातील लॉज, हॉटेल्सवर धाडी टाकून जोडप्यांना अटक करून आपली नैतिक पोलीसगिरी चालूच ठेवणार आहेत, कारण ‘समज देऊन सुटका’ करण्याची सवलत फक्त महाराष्ट्रातील मंत्र्यांनाच आहे, असे ‘सामना’ने म्हटले आहे.

याच अग्रलेखात ‘लाडकी बहीण’ योजनेतील 4 हजार 800 कोटींच्या घोटाळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. ‘बहिणीं’चा वेश परिधान करून हे पैसे लाटणाऱ्या हजारो पुरुषांनाही मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र मिळेल आणि “आपण लुटमारीचा, फसवणुकीचा गुन्हा केला असला तरी हजारो गुन्हेगार भावांना समज देऊन सोडून देत आहोत. यापुढे असले गुन्हे करताना पकडले जाणार नाहीत याची काळजी घ्या,” अशी सक्त ताकीद फडणवीस देतील, अशी शंकाही अग्रलेखात व्यक्त केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago