Dombivli Drug News : डोंबिवलीच्या उच्चभ्रू वसाहतीतून थेट बहरिनला! ‘एमडी सम्राट’ फहरानचा थरारक पर्दाफाश

Dombivli Latest Drug News : दोन कोटींहून अधिक किंमतीच्या एमडी प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर जेरबंद!
डोंबिवली :- डोंबिवलीजवळील खोणी पलावा येथील उच्चभ्रू वसाहतीतील डाऊन टाऊन इमारतीतून मेफेड्रॉन (एमडी) च्या तस्करीप्रकरणी तब्बल दोन कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थ प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी फहरान उर्फ मोहम्मद रहिम सलीम शेख (32 वय) याला मानपाडा पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. तो बहरिनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. Dombivli Latest Crime News
फहरान हा मुंब्रा येथील रहिवासी असून तो या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये एक महिला आरोपीही आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई सुरू झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने डाऊन टाऊन इमारतीवरील छाप्यात 1 किलो 93 ग्रॅम एमडी पावडर हस्तगत केली होती. या अमली पदार्थाची किंमत 2.12 कोटी रुपये आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे असिल सुर्वे (26 वय), मोहम्मद इसा कुरेशी, व महिला आरोपी मेहेर फातिमा कुरेशी हे तिघे असून ते मेफेड्रॉन विक्रीसाठी कार्यरत होते. मात्र या टोळीचा म्होरक्या फहरान छाप्याच्या वेळी फरार झाला होता.
तपासादरम्यान फहरान हैदराबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बहरिनला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी 29 जून रोजी तेथे सापळा रचताच फहरानला अटक केली. त्याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीप्रमाणे फहरानचा मोटारी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात असले तरी, तो अंमली पदार्थ तस्करीशी थेट संबंधित असल्याचा संशय अधिक गडद होत आहे. पोलिसांनी आता फहरानच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू केला आहे. या टोळीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कलगौडा पाटील, तसेच संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण, मिननाथ बडे, किशोर दिघे यांच्या विशेष पथकाने केली.


