Sadabhau Khot : रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी त्या वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी
Sadabhau Khot Sharad Pawar :शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खुद्द अजित पवारांनीच सदाभाऊ खोत यांना दिला होता इशारा
मुंबई :- रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी शरद पवारांवर Sharad Pawar आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून सदाभाऊ खोत यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली होती. महाविकास आघाडीसह महायुतीतील अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. कोणाच्या व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा माझा हेतू नव्हता, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त करताना ग्रामीण भाषेचा दाखला दिला. “कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.
त्यासाठी मातीत रुजावे, झिजावे अन् राबावे लागते पुढे बोलताना खोत म्हणाले की, गावाकडे एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही त्याला जा आरशात जाऊन बघ जरा, असे म्हणतो. पण गावगाड्यातील भाषा समजून घेण्यासाठी मातीत रुजावे लागते, झिजावे लागते, राबावे लागते. त्यावेळीच गावाकडील आणि मातीची भाषा समजते, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.
अजित पवारांनी दिला होता इशारा
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.