Sabha Raut : ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांचे स्पष्टीकरण, शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut On Thackeray Brothers : ‘हा इंडिया आघाडीचा विषय नाही’; ‘लाचारांचा गट तुमच्यासोबत’ म्हणत राऊतांचा फडणवीसांना टोला
मुंबई :- मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर खासदार संजय राऊत यांनी आज मोठे विधान केले आहे. दोन बंधू एकत्र येत असतील तर कोणाला काय अडचण असेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.
‘ठाकरे बंधूंचा एकत्र येणे हा इंडिया आघाडीचा विषय नाही’
संजय राऊत म्हणाले की, दोन बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील तर कोणाला काही अडचण नसावी. हा विषय दिल्लीत चर्चा करण्यासारखा नाही, कारण दोन बंधू स्थानिक पातळीवर एकत्र येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणे हा ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाही, परंतु मराठी कोणी बोलणार नाही, म्हटल्यावर भडका उडतो, असेही ते म्हणाले.
‘लाचारांचा गट तुमच्यासोबत’
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “आम्ही आमच्या अटी-शर्तींवर दिल्लीत जातो. कोणाची लाचारी पत्करून आम्ही दिल्लीत जात नाही. फडणवीसांना माहिती आहे की जो लाचारांचा गट होता, तो तुमच्यासोबत आहे, जो शेपट्या हालवत तुमच्यामागे दिल्लीत फिरतो.” यामुळे फडणवीसांनी आम्हाला स्वाभिमानाचा विषय सांगू नये, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला.
‘संघर्षासाठी आम्ही तयार’
वरळीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या तणावाच्या स्थितीवर बोलताना राऊत यांनी थेट इशाराच दिला. ते म्हणाले, “कालच्या घटनेकडे आमचे लक्ष होते. पण आम्ही कोणत्याही संघर्षासाठी आता तयार आहोत.” तसेच निवडणूक आयोगाच्या विरोधातील लढा कायम राहील आणि राहुल गांधींकडून आम्हाला आशा आहे, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या मागच्या रांगेत बसण्याबद्दलच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत, ‘समोरचे प्रेझेंटेशन स्पष्ट दिसत नसल्याने मागे बसलो,’ असे स्पष्टीकरण दिले.



