ठाणेमुंबई

Uddhav Thackeray : “निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या नसतील तर ‘इलेक्शन’ नको, ‘सिलेक्शन’ करून मोकळे व्हा!” – उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला संतप्त सल्ला

Uddhav Thackeray On Election Commission : “भाजप कार्यकर्त्यांनी यादीशी खेळ केला”; 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही आयोगाला पत्र दिल्याचा उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्यांनी आज (15 ऑक्टोबर) राज्य निवडणूक आयोगावर (Election Commission) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आयोगाच्या कामकाजावर आसूड ओढले.

या बैठकीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

“इलेक्शन नको, सिलेक्शन करून मोकळे व्हा!”

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला अत्यंत कठोर शब्दांत आव्हान दिले. ते म्हणाले, “आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला निष्पक्षपणे, पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तरच या निवडणुका घ्या, अन्यथा तुम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.” लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘भाजप कार्यकर्ते मतदार यादीशी खेळत आहेत’

मतदार याद्यांमधील घोळ ही नवीन समस्या नसून ती गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही लक्षात आली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मागील निवडणुकीच्या एक महिना आधी, 19 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र दिले होते.

ते म्हणाले, “आम्ही सांगितलं होतं की काही भाजप कार्यकर्ते मतदार यादीशी खेळतायत. त्यांना वाटेल त्या व्यक्तीला ते मतदार यादीत घुसवतायत, तर त्यांना वाटेल त्या व्यक्तीचं नाव यादीतून वगळलं जात आहे.”

यादीतील घोळ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “एकाच घरात 200 ते 400 लोक राहात असल्याचं यादीत पाहायला मिळालं. या लोकांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे.”

लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपला आवाहन

लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपने या बैठकीला न येण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “आम्ही भारतीय जनता पार्टीला देखील पत्र पाठवलं होतं की तुम्ही देखील या चर्चेला या. परंतु, ते काही आले नाहीत. काल झालेल्या बैठकीला आणि आजच्या बैठकीलाही भाजपाकडून कोणीही आलं नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0