मुंबई

Rohit Pawar : ‘कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला हवं होतं’ – रोहित पवारांची सरकारवर टीका

•दादरच्या आंदोलनात रोहित पवारांची एन्ट्री; जैन समाजाच्या बाजूने उभे राहत सरकारला धारेवर धरले.

मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरचा कबुतरखाना बंद करण्यात आल्याने बुधवारी जैनधर्मीय आक्रमक झाले. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी जैन समाजाची बाजू उचलून धरत महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

आंदोलकांनी कबुतरखाना बंद करण्यासाठी लावलेली ताडपत्री फाडून टाकली आणि वाहतूक रोखून धरली. यानंतर रोहित पवार यांनी कबुतरखान्यासमोरच्या जैन मंदिरात आंदोलकांशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जैन समाजाची भूमिका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाही, तर पक्ष्यांना हानी होऊ नये अशी आहे.

पवार यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, “कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला पाहिजे होतं. ते कसे बंद करावेत, झाकावे आणि त्या पक्ष्यांचे काय होईल, याचा विचार पालिकेने करायला हवा होता.” त्यांनी पुढे सांगितले की, नायर आणि के.ई.एम. रुग्णालयाच्या अहवालात कबुतरांमुळे रोगराई वाढल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून संवेदनशीलपणे तोडगा काढायला हवा.

रोहित पवार यांनी जैन समाजाच्या भावनांना किंमत देण्याचे आवाहन करत, ‘धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे,’ असे म्हटले. त्यांच्या या भूमिकेमुळे या वादाला आता राजकीय रंग मिळाला असून, महायुती सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0