मुंबई

Rohit Pawar : ‘सरकार मराठा आंदोलकांची गैरसोय करण्याचा कट रचत आहे’; मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर रोहित पवारांचा हल्लाबोल

•‘सरकारकडून दगाफटका झाल्यास मोठी चूक’; रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना थेट इशारा

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यासाठी तब्बल 48 तास प्रवास करून नेते मनोज जरांगे पाटील अखेर आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांनी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, आंदोलकांची गैरसोय होत असल्याचा दावा केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ (X) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकशाहीचे खरे तत्त्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल, तर ते हुकूमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.” त्यांनी पुढे म्हटले की, “एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था सरकारने केलेली नाही. तसेच, आझाद मैदानावर पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.”

‘खाऊगल्ल्या बंद करण्याचे फतवे’
रोहित पवार यांनी गृहविभागावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरू ठेवायला हव्यात.” त्यांनी गृहविभागाला हे अलिखित फतवे तात्काळ मागे घेऊन खाऊगल्ल्या पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्याचे आवाहन केले.

‘सरकार मोठी चूक करत आहे’
“या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल, तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये,” असा थेट इशाराही रोहित पवार यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, “गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा अशी चूक होऊ देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे!”

vivek

Recent Posts