
Thane Accident Latest News : वाहनांचा अक्षरश: चुराडा; वसई खाडी पुलापर्यंत लांबच लांब रांगा, 4 गंभीर जखमींना रुग्णालयात हलवले
ठाणे | ठाण्याची आजची सकाळ एका भीषण अपघाताने हादरली आहे. घोडबंदर येथील अत्यंत वर्दळीच्या गायमुख घाटात आज (शुक्रवारी) सकाळी 14 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या साखळी अपघातात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या अपघातामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने एक अवजड वाहन येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. याच वेळी काही हलकी वाहने विरुद्ध दिशेने जात होती. नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांना जोरात धडकली. या अपघातात रिक्षा, कार, टेम्पो आणि अवजड वाहने अशा एकूण 14 गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्यांचा तर इतका भयानक चुराडा झाला आहे की त्या ओळखणेही कठीण झाले आहे.
जखमींची संख्या वाढण्याची भीती अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक शाखा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने चार गंभीर जखमींना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, अनेक प्रवासी स्वत:हून उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत गेल्याने जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. सुदैवाने, प्राथमिक माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांचे आवाहन रस्त्यावर वाहनांच्या काचा आणि सुटे भाग विखुरलेले असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोंडी: गायमुख ते वसई खाडी पुलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
पर्यायी मार्ग: गरज नसल्यास नागरिकांनी घोडबंदर मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
घोडबंदर मार्गाचा वाढता धोका पालघर, गुजरात आणि मुंबईला जोडणारा हा मार्ग जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ओळखला जातो. मात्र, घाट रस्ता आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात. आजच्या घटनेने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


