Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | ‘देवगिरी’वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत राजेंद्र आणि युगेंद्र पवारही मैदानात
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या तपासावरून राजकारण तापलेले असतानाच, आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर हा फोन आल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन तपासा संदर्भात नसून अजितदादांच्या नियोजित स्मारकाच्या चर्चेसाठी करण्यात आला होता.
काय होती मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा?
रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे अजित पवार यांचे मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थान आणि बारामती येथे भव्य स्मारक करण्याची मागणी केली होती. आगामी अर्थसंकल्पात या स्मारकांसाठी विशेष निधीची तरतूद करण्याबाबत चर्चा करण्यासाठी हा फोन करण्यात आल्याचे समजते. मात्र, एका बाजूला रोहित पवार सरकारवर तपासात अडथळे आणल्याचा आरोप करत असतानाच, दुसऱ्या बाजूला स्मारकाच्या विषयावरून आलेल्या या फोनमुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत.
बारामती पोलीस ठाण्याला ‘छावणी’चे स्वरूप
मुंबई पोलिसांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यास नकार दिल्यानंतर, रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात धडक देणार आहेत.
पवार कुटुंब एकत्र: रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि बंधू युगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.
कार्यकर्त्यांचा एल्गार: आपल्या नेत्याच्या मृत्यूचा छडा लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) हजारो कार्यकर्ते बारामती पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. “मुंबईत गुन्हा दाखल झाला नाही, पण बारामतीत तो करावाच लागेल,” असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
एकाच वेळी दोन महत्त्वाच्या घडामोडी
रोहित पवार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जात असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल आणि रोहित पवारांच्या ‘घातपाता’च्या आरोपांना काय उत्तर दिले जाईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


