ठाणे

Rohit Pawar : ‘देवाभाऊ’च्या जाहिरातींवरून महाराष्ट्रात राजकीय वादंग; कोट्यवधींचा खर्च कुणी केला, विरोधकांचा सरकारला सवाल!

Rohit Pawar On Devendra Fadnavis : ‘निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड’, रोहित पवारांनी बावनकुळेंना थेट लक्ष्य केले; ‘पैशांची उधळपट्टी नाही का?’, असाही केला सवाल

मुंबई :- गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींनी मोठा वाद निर्माण केला आहे. सर्व प्रमुख मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘देवाभाऊ’ असा एकच शब्द असलेल्या या जाहिराती दिसत आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी फुले अर्पण करताना दिसत आहेत आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोषही ऐकू येत आहे. मात्र, या जाहिराती कोणी दिल्या, यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

या जाहिरातींवर होत असलेल्या प्रचंड खर्चावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना अशा जाहिरातींवर खर्च करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सविस्तर पोस्ट लिहून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट प्रश्न विचारला आहे.

रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “बावनकुळे साहेब, तुम्ही रोज 40 कोटी ऐवजी 400 किंवा 4000 कोटींच्या जाहिराती छापा, आमचा आक्षेप नाही. पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या? हा आमचा मुख्य आक्षेप आहे. निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते, हे तुम्हाला चांगलं माहीत असेल.”

ही जाहिरात भाजपची नसल्यास ती कोणत्या कंपनीने किंवा नेत्याने दिली, असा सवालही त्यांनी विचारला. “उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांहून अधिक दंड माफ केला होता, त्या कंपनीने ही जाहिरात दिली आहे का?”, असे म्हणत रोहित पवारांनी थेट बावनकुळेंना लक्ष्य केले आहे.

बावनकुळे यांच्याकडून रोहित पवार यांच्यावर पलटवार

दरम्यान, रोहित पवारांच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळेंनी एक्सवर पोस्ट करून उत्तर दिलं आहे. “श्री रोहित पवारजी, फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा. अन्यथा राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध”, असं आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे.

vivek

Recent Posts