मुंबई

Rohit Pawar : ‘ओल्या दुष्काळात कोरड्या आणि खोट्या घोषणा’; आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar On Maharashtra Sarkar : ‘2200 कोटींची मदत जून-ऑगस्टमधील नुकसानीची’; सप्टेंबरसाठी तातडीची मदत नाही

मुंबई :- राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीवर राज्य सरकारने केलेल्या मदतीच्या घोषणांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ‘ही ओल्या दुष्काळात कोरड्या आणि खोट्या घोषणा’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केलेली 2,215 कोटींच्या मदतीची घोषणा फसवी असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा

रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “‘पहिल्यांदाच आपत्ती सुरू असतानाच आम्ही पैसे रिलीज करणे सुरू केले आहे,’ ही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पूर्णतः खोटी आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री जे 2,200 कोटी रुपये रिलीज केल्याचे सांगत आहेत, ती रक्कम प्रत्यक्षात जून-ऑगस्ट महिन्यातील नुकसानीची भरपाई आहे. दोन महिने उलटून गेल्यानंतर ही मदत आता मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या, म्हणजेच सप्टेंबरमधील नुकसानीसाठी सरकारकडून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.

तातडीची मदतही नाही

रोहित पवार यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे की, “सप्टेंबरमधील नुकसानीसाठी तातडीची मदत सोडाच, पण कपडे, भांडी, अन्नधान्य यांसारख्या वस्तूंसाठीदेखील कोणताही जीआर (शासकीय निर्णय) निघालेला नाही.”

त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे की, सरकारने तात्काळ तातडीची मदत देऊन शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. तसेच, सरकार ओला दुष्काळ का जाहीर करत नाही, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

vivek

Recent Posts