मुंबई

Rohini Khadse शिशेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत!” – रोहिणी खडसेंचा फडणवीसांना टोला

Rohini Khadse : आणीबाणीच्या 50 वर्षांनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा लेख चर्चेत; शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसेंची भाजपवर परखड टीका

मुंबई | 25 जून 1975 — देशाच्या लोकशाही इतिहासातील काळाकुट्ट दिवस. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दिवशी आणीबाणी जाहीर करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घातले. त्या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी एका अग्रलेखातून आणीबाणीचा निषेध करत काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. मात्र त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी फडणवीसांच्या लेखावर निशाणा साधताना, “ज्यांच्या स्वतःच्या घराचे भिंती काचांच्या आहेत, त्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत,” अशा शब्दांत थेट टोला लगावला आहे.

खडसे यांनी फडणवीसांचा लेख सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर सवालांची सरबत्ती केली. त्या म्हणाल्या, “1975 मध्ये आणीबाणी लादली, हे खरेच. पण आजची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे का? आज माध्यमं, निवडणूक आयोग, स्वायत्त संस्था खरंच स्वतंत्र आहेत का? सत्तेवर असलेल्या पक्षाने स्वतःच काळा इतिहास असताना इतरांवर टीका करावी, हे शोभत नाही.”

“आज काहींनी वर्तमानपत्रांमधून आणीबाणीवर रकाने भरून लिहिले आहेत. पण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायसंस्था आणि माध्यम स्वातंत्र्याचं काय झालं आहे, हे ही पाहायला हवं,” असं सांगत खडसेंनी भाजपवर सवाल उभे केले.

आणीबाणीच्या 50 वर्षानंतरही ही घटना राजकीय कुरघोड्यांचा विषय बनताना दिसत आहे. एकीकडे भाजप काँग्रेसच्या त्या निर्णयावर टीका करत आहे, तर दुसरीकडे विरोधक सध्याच्या सरकारवर लोकशाहीचा गळा घोटण्याचे आरोप करत आहेत. त्यामुळे आजचा दिवस पुन्हा एकदा राजकीय घमासानाचा साक्षीदार ठरतो आहे.

vivek

Recent Posts