Pune News : भरदिवसा सराफ दुकानावर बंदुकीच्या धाकाने दरोडा; एक चोरटा 5 तासांत अटकेत

•महिलेवर हल्ला, सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला सुराग; अल्पवयीन आरोपीची कबुली
पुणे | शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात भरदिवसा सराफ पेढीवर बंदुकीच्या धाकाने दरोडा टाकत 4 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी (दि.1 जुलै 2025) दुपारी दीड वाजता घडली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3 व नांदेड सिटी पोलिसांच्या संयुक्त पथकाने 5 तासांत एक संशयित चोरटा अटक करून मोठे यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असून त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही उघड केली आहेत.
वडगाव बुद्रुक येथील रेणुकानगरी भागातील ‘गजानन ज्वेलर्स’ या दुकानात दोन चोरट्यांनी मास्क घालून प्रवेश केला. त्यातील एकाने गुलाबी रंगाचे जॅकेट घालून दुकानदाराच्या दिशेने पिस्तुल रोखले, तर दुसऱ्याने काळ्या जॅकेटमध्ये लोखंडी हत्याराने फिर्यादी मंगल शंकर घाडगे (वय 55) यांच्या डोक्यावर व हातावर हल्ला केला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
यानंतर चोरट्यांनी दुकानातील काचेचे कपाट फोडून पाच तोळ्यांचे दागिने लंपास केले. तिसरा साथीदार दुकानाबाहेर मोटरसायकलवर तयार होता. तिघांनी हत्यारे हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. ही संपूर्ण घटना एका चारचाकी वाहनाच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, नांदेड सिटी पोलिसांच्या डीबी पथकाने आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून पोलीस शिपाई स्वप्नील मगर, प्रतिक मोरे आणि पुरुषोत्तम गुन्ला यांना खबर मिळाली की डॅशकॅमेऱ्यात दिसलेला तरुण आंबेडकर चौक, वारजे येथे थांबलेला आहे. तत्काळ कारवाई करत, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या तरुणाला अटक केली.
त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. तो अल्पवयीन असून उत्तमनगर परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याचे इतर साथीदार सिंहगड रोड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून, गुन्ह्याचा मास्टरमाईंड (प्लॅनर) कोण होता हे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तिघांचा शोध विविध पथकांकडून घेतला जात आहे.
केवळ पाच तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक करून तपासात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
या कारवाईत नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे निरीक्षक गुरुदत्त मोरे, युनिट ३ चे भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक राहुल यादव, ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक गणेश फरताडे आणि त्यांचे सहकारी स्वप्नील मगर, प्रतिक मोरे, पुरुषोत्तम गुन्ला, संग्राम शिनगारे, निलेश खांबे, अतुल साठे आदींचा मोलाचा सहभाग आहे.



