Mumbai Rain Update : मुंबईत अखेर जोरदार पावसाची बॅटिंग; उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा

•Mumbai Weather Today : भायखळा, दादर, अंधेरीसह अनेक उपनगरांत पावसाचा जोर अधिक, वातावरणात गारवा
मुंबई :- गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर काल (सोमवार, 24 सप्टेंबर) मुंबई शहरात जोरदार पुनरागमन केले आहे. सकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून, वातावरण कमालीचे थंड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र या पावसाने मुंबईकरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणले आहे.
कुठे कुठे झाला पाऊस?
आज मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. भायखळा, दादर, वरळी, परळ, प्रभादेवी तसेच उपनगरातील वांद्रे, अंधेरी, बोरिवली, दहिसर या भागांमध्ये चांगला पाऊस झाला. कामावर निघालेल्या आणि अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही मुंबईकरांची तारांबळ उडाली, पण एकूणच पावसाच्या आगमनाने आनंद व्यक्त होत आहे.
तापमानात मोठी घट
पावसाच्या आगमनामुळे शहराच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 27.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा 3 अंशांनी कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते, मात्र आता त्यांना मोठा आराम मिळाला आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 20 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे पाण्याची चिंताही काही प्रमाणात दूर झाली आहे.


