पुणे

Pune News : “माळेगावची सत्ता अजित पवारांकडे! सहकाराच्या मैदानात शरद पवारांना जोरदार धक्का”

नीळकंठेश्वर पॅनलचा विजय निश्चित; ब गटातून खुद्द अजितदादांचा झंझावात

पुणे | पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एकेकाळी दबदबा असलेल्या शरद पवारांच्या गडात आता सत्ता परिवर्तन होताना दिसत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनल स्पष्ट आघाडीवर असून सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. खुद्द अजित पवारांनी ब गटातून विजयी होत निवडणुकीच्या रणांगणात आपली ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत 21 जागांपैकी तब्बल 14 जागांवर नीळकंठेश्वर पॅनल आघाडीवर होता. तर चंद्रकांत तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलने 4 जागांवर मुसंडी मारल्याचे संकेत आहेत. आश्चर्य म्हणजे शरद पवारांच्या बळीराजा पॅनलचा एकही उमेदवार विजयी दौडीत दिसत नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही बारामतीच्या सहकार राजकारणातली मोठी उलथापालथ आहे.

शरद पवारांचे ‘बळीराजा’ गायबच; तावरे गटही पिछाडीवर

शरद पवारांनी नातू युगेंद्र पवारच्या पाठीशी उभं राहत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी सत्तेतील ताकद वापरून “माळेगावसाठी 550 कोटी रुपये आणतो” असे थेट आश्वासन दिल्याने शेतकरी मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.

शरद पवारांची नाराजी, अजितदादांची स्पष्टोक्ती

या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्याने निवडणुकीत थेट सहभागी न व्हावे अशी भूमिका मांडली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “ही त्यांची भूमिका आहे, माझी भूमिका प्रत्यक्ष सहभागाची आहे.” या निवडणुकीत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरून जणू ‘मीच पुढचा नेता’ हे दाखवून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0