Ravindra Dhangekar : पुण्यात मतदानापूर्वी धंगेकरांचा ‘धडाका’! डान्स बारचा व्हिडिओ अन् भाजप उमेदवारांवर ‘चारित्र्यहीन’चा शिक्का; पुण्याच्या राजकारणात भूकंप

Ravindra Dhangekar Allegations On Pune PMC Corruption : “टेंडरचा पैसा बारबाळांवर उडवला”; धंगेकरांचा भाजपवर प्रखर प्रहार; मुरलीधर मोहोळ अन् चंद्रकांत पाटलांना विचारला जाब
पुणे | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी PCMC Election उद्या (15 जानेवारी) मतदान होणार आहे. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत एकच खळबळ उडवून दिली आहे. “भाजपने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळे आरक्षण ठेवले आहे का?” असा जहरी सवाल धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे विचारला आहे.
डान्स बार व्हिडिओवरून भाजपची कोंडी
धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपच्या एका प्रचार प्रमुखावर गंभीर आरोप केले आहेत. “महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्स बारमध्ये उडवला जात आहे. ज्या पक्षाचे प्रचार प्रमुखच असे असतील, त्यांच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर, प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत, त्यांनी भाजपला ‘चारित्र्यहीन क्वालिटीचा’ पक्ष संबोधले आहे.
आमदारांच्या आर्थिक व्यवहारांवर निशाणा
रवींद्र धंगेकर यांनी शिवाजीनगर मतदारसंघाच्या भाजप आमदारांचा उल्लेख करत म्हटले की, “संबंधित व्यक्ती आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळते आणि त्याच पैशातून बारबाळांसाठी ‘कोटा’ आरक्षित ठेवला जातो.” या विधानामुळे पुण्यातील भाजप आमदारांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांना विचारला जाब
भाजप नेहमीच ‘संस्कृती’ आणि ‘मूल्यांची’ भाषा करते. याच मुद्द्यावरून धंगेकरांनी खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. “संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी आता खुलासा करावा की, त्यांच्या पक्षात अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत? या सर्व गोष्टीच भाजपला ‘पार्टी विथ डिफरन्स’ बनवतात,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.



