मुंबई

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपची धुरा प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

•चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली; रिजिजू यांच्या उपस्थितीत घोषणा

मुंबई | भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून, अनेक दिवसांपासून रंगलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व निरीक्षक किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला होता. मात्र, कोणत्याही प्रतिस्पर्ध्याचा अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली.

आता मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदा अशा महत्वाच्या निवडणुकांचे वळण भाजपपुढे असून, या रणधुमाळीत पक्षाला यशाकडे नेण्याची धुरा रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली आहे. पक्ष संघटनेला नवसंजीवनी देणे, अंतर्गत गटबाजीचा बंदोबस्त करणे आणि नव्या नेतृत्वाला संधी देणे — ही त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.

रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार असून, त्यांनी गेल्या निवडणुकीत तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. शिंदे सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी निभावली असून, आता पक्षाध्यक्ष म्हणूनही ते भाजपसाठी महत्त्वाचे शिलेदार ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0