Ratnagiri Bribe News : लाचखोरीचा कळस! रत्नागिरीत वर्ग-1 अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

Ratnagiri Class 1 Officer Arrested While Taking Bribe : 16,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक; जिल्हा परिषदेत मोठी खळबळ
रत्नागिरी :- रत्नागिरीच्या सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच वेळी तीन शासकीय कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई करत, त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. Ratnagiri Bribe News या आरोपींमध्ये एका वर्ग-1 अधिकाऱ्याचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Ratnagiri Latest Bribe News
नेमकं काय घडलं?
या कारवाईत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहायक संचालक (वर्ग-1) शरद रघुनाथ जाधव (वय 53), जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये (वय 45) आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी (वय 38) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी वगळण्यासाठी मागितली होती लाच
या प्रकरणातील तक्रारदार हे दापोली पंचायत समितीमध्ये सहायक लेखाधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या लेखापरीक्षण अहवालातील 21 प्रलंबित मुद्दे वगळण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. या मुद्द्यांची पूर्तता करूनही अंतिम अहवाल देण्यासाठी जाधव यांच्या वतीने शिपाई घवाळी याने 24,000 रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीचा सापळा
तक्रारदाराने 11 सप्टेंबर, 2025 रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केली असता, 15 मुद्दे वगळण्यासाठी 16,500 रुपये लाच घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी एसीबीने सापळा रचला.
यावेळी, सहायक संचालक जाधव यांच्या संमतीने शिपाई घवाळीने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली आणि ती लगेचच सहायक लेखाधिकारी शेट्ये यांच्याकडे दिली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले. या यशस्वी कारवाईमुळे शासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली असून, तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


