Ratnagiri Bribe News : रत्नागिरीत लाचखोरीचा पर्दाफाश; वर्ग-1 अधिकाऱ्यासह तीन जण एसीबीच्या जाळ्यात

•लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी 24 हजार रुपयांची मागणी
रत्नागिरी :- रत्नागिरीच्या सरकारी कार्यालयात लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील एका वर्ग-1 अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
या कारवाईत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक शरद रघुनाथ जाधव (वर्ग-1), जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात तक्रारदार हे दापोली पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे 2020-21 आणि 2021-22 या वर्षांचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. या अहवालातील 21 प्रलंबित मुद्दे वगळण्यासाठी सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या वतीने शिपाई सतेज घवाळी याने तक्रारदाराकडे 24 हजार रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीने रचला सापळा
तक्रारदाराने 11 सप्टेंबर, 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तातडीने तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीनंतर 16,500 रुपये देण्याचे ठरले.
गुरुवारी, 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.46 वाजता एसीबीच्या पथकाने स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात सापळा रचला. यावेळी सहाय्यक संचालक जाधव यांच्या संमतीने शिपाई घवाळीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली आणि ती रक्कम तात्काळ जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे दिली. त्याचवेळी, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.
रात्री उशिरापर्यंत या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एकाच वेळी तीन सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनामध्ये लाचखोरीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.


