रत्नागिरी: विम्याच्या कागदपत्रांसाठी मागितली लाच; सावर्डेचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे ‘एसीबी’च्या जाळ्यात

Chiplun Latest Bribe News : 25 हजारांची मागणी, 15 हजार स्वीकारताना कारवाई | मृताच्या कुटुंबाची अडवणूक करणारा अधिकारी अटकेत
चिपळूण (रत्नागिरी) :- मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मृताच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असणारा ‘आरटीओ तपासणी अहवाल’ आणि ‘डीएआर’ (Detailed Accident Report) फॉर्म मिळणे गरजेचे होते. मात्र, हे कर्तव्य बजावण्यासाठी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांनी चक्क 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्रयस्त व्यक्तीमार्फत स्वीकारली लाच
तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मनीष कांबळे यांनी ही रक्कम थेट न स्वीकारता अभिजीत शिर्के नावाच्या त्रयस्त व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारण्याचे ठरवले. तडजोडीअंती 15 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, कर्तव्यदक्षतेऐवजी मृताच्या नातेवाईकांची अडवणूक करणाऱ्या या अधिकाऱ्यावर सर्वत्र टीका होत आहे.



