मुंबईठाणे
Trending

Ramesh Pardeshi : मुळशी पॅटर्न फेम ‘पिट्या भाई’ची ‘घरवापसी’! अभिनेते रमेश परदेशी यांनी राज ठाकरेंना सोडले, भाजपमध्ये प्रवेश

Ramesh Pardeshi Joined BJP : ’20 वर्षे मनसेत काम केले, पण संघाचे संस्कार खुणावत होते’ – रमेश परदेशी यांचा पक्ष प्रवेशानंतर मोठा खुलासा

पुणे :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतराचा मुद्दा चर्चेत असतानाच, एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामुळे ‘पिट्या भाई’ म्हणून गाजलेले अभिनेते रमेश परदेशी Ramesh Pardeshi यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी आज (19 नोव्हेंबर) भाजपचे कमळ हाती घेतले.

भाजप प्रवेशाचे कारण आणि संघनिष्ठा

पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना रमेश परदेशी यांनी आपल्या भाजप प्रवेशामागची कारणे स्पष्ट केली.

“मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंसह मागची २० वर्षे काम करत होतो. आत्ता बदलेली राजकीय स्थिती पाहता कलाकारांना, मराठी चित्रपटांना न्याय देण्यासाठी आणि माझ्यावर असलेले संघाचे संस्कार हे मला खुणावत होते. त्यामुळे मी जाहीर रित्या भाजपात प्रवेश केला आहे.”

राज ठाकरेंबद्दल तक्रार नाही, पण ‘तत्त्व’ महत्त्वाचे

रमेश परदेशी यांनी यावेळी राज ठाकरेंबद्दल कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.

“माझी राज ठाकरेंबाबत किंवा मनसेबाबत कुठलीही तक्रार नाही. प्रश्न संस्कार आणि तत्त्वाचा आहे, संघ हा माझा संस्कार आहे. मला माझ्या संस्कारांनी सांगितलं की तू तुझ्या विचारांसह असलं पाहिजे म्हणून मी भाजपात आलो आहे.”

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखरपणे देश चालवत आहेत. त्याचप्रमाणे आपण राज्य सरकारच्या मदतीने मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटांचे प्रश्न सोडवण्याचे काम करणार आहोत. ‘राष्ट्र प्रथम’ याच तत्त्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले.

कोण आहेत रमेश परदेशी?

अभिनेते रमेश परदेशी यांनी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 2017 मध्ये आलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘पिट्या भाई’ या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.

रमेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशामुळे आता आगामी काळात मनसे आणि भाजपमध्ये राजकीय चर्चांना जोर येणार आहे. यावर राज ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0