
Ashish Shelar On Best Election : शशांक राव यांच्या पॅनेलचा विक्रमी विजय, तर भाजपच्या ‘सहकार समृद्धी पॅनेल’ला 7 जागा; मुंबई भाजपसाठी ‘शुभसंकेत’
मुंबई :- मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्रितपणे लढवलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, या पॅनेलला एकही जागा जिंकता आलेली नाही. याउलट, शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवून जोरदार मुसंडी मारली आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) देखील आपली ताकद दाखवून दिली आहे. ‘सहकार समृद्धी पॅनेल’च्या माध्यमातून भाजपने 7 जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार Ashish Shelar On Best Election यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हा विजय भाजपसाठी मुंबईकरांनी दिलेला ‘शुभसंकेत’ आहे.
‘मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले’
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील विजयाबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, “बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला. ज्यांनी केवळ ‘पत’ आणि ‘पेढी’साठी निवडणूक लढवली, त्यांना मोठा भोपळा मिळाला.” शेलार यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. या विजयामुळे भाजपचा मुंबईतील पाया अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या निवडणुकीतील निकाल हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. दोन मोठ्या पक्षांनी एकत्र येऊनही त्यांना विजय मिळवता आला नाही, तर दुसरीकडे शशांक राव आणि भाजपने यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मुंबईतील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मंत्री आशिष शेलार यांचे ट्वीट
भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत !! बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि “पत” आणि “पेढी”साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत !! बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या “निर्भय”वक्त्यांपर्यंत…सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची!!, असे आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे.
आमदार प्रसाद लाड यांचे ट्वीट
या निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रसाद लाड यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. “बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड 21 विरुद्ध शून्य असा पराभूत झाला आहे, याचाच अर्थ ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत.” असे प्रसाद लाड यांनी म्हटले.


