
Ramdas Athavle On Mumbai BMC Election : नाराज आठवलेंची मनधरणी यशस्वी; उर्वरित 27 जागांवर रिपाइं स्वबळावर लढणार, उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होणार
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये (भाजप-शिवसेना) रिपाइंला स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या रामदास आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रिपाइंचा महायुतीत समावेश झाला आहे. या नव्या तडजोडीनुसार, भाजप आणि शिवसेना आपापल्या कोट्यातील प्रत्येकी 6-6 अशा एकूण 12 जागा रिपाइंला सोडणार आहेत.
असे असेल महायुतीचे नवे जागावाटप
सुरुवातीला भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र रिपाइंच्या एन्ट्रीमुळे हे समीकरण बदलले आहे.
भाजप: 131 जागा (6 जागा रिपाइंला सोडल्या)
शिवसेना (शिंदे गट): 84 जागा (6 जागा रिपाइंला सोडल्या)
रिपाइं (आठवले गट): 12 जागा (महायुतीकडून अधिकृत)
इतर: 2 जागांवर एबी फॉर्मच्या घोळामुळे उमेदवार नाहीत.
उर्वरित 27 जागांवर ‘स्वबळ’
रामदास आठवले यांच्या पक्षाने मुंबईतून एकूण 39 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून केवळ 12 जागा मिळत असल्याने, उर्वरित 27 जागांवर रिपाइं आपले उमेदवार अपक्ष किंवा स्वबळावर रिंगणात ठेवणार असल्याचे समजते. “आम्ही 39 अर्ज भरले आहेत, त्यातील 12 जागा युतीत मिळतील आणि उर्वरित जागांवर आमचे कार्यकर्ते ताकदीने लढतील,” असे संकेत आठवले यांनी दिले आहेत.


नाराजी नाट्यानंतर ‘वर्षा’ आणि ‘ठाणे’ वारी
जागावाटपात डावलले गेल्यामुळे रामदास आठवले अत्यंत नाराज होते. त्यांनी तातडीने ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी रिपाइंला सन्मानजनक जागा देण्याचे आश्वासन दिल्याने अखेर हा तिढा सुटला आहे.
रिपाइंचे मुंबईतील काही प्रमुख उमेदवार आणि वॉर्ड:
स्नेहा कासारे (१८६), बापूसाहेब काळे (१८१), सचिन मोहिते (२००), रमेश सोनावणे (१४६), ज्योती जेकटे (१५५), विनोदकुमार साहू (२२३), श्रावण मोरे (९०), नितीन कांबळे (८९) यांच्यासह 39 जणांनी अर्ज भरले आहेत.


