
Rakhi Jadhav Joined BJP : जागावाटपावरून नाराजी नाट्य; ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शरद पवार गटाच्या वाट्याला अवघ्या 5 ते 10 जागा आल्याचा फटका
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंची युती आकाराला येत असतानाच, शरद पवार गटाला मुंबईत मोठे खिंडार पडले आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) धुरा एकहाती सांभाळणाऱ्या आणि निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या राखी जाधव Rakhi Jadhav या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जागावाटपात शरद पवार गटाला मुंबईत अत्यंत कमी महत्त्व मिळाल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे.
नाराजीचे मुख्य कारण
जागावाटपाचा तिढा मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती केली आहे. मात्र, या युतीत शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ 5 ते 10 जागा आल्याची माहिती समोर आली आहे. राखी जाधव या मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून अनेक दिवसांपासून पक्ष बांधणीसाठी कष्ट घेत होत्या. मात्र, जागाच कमी मिळाल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे त्यांना कठीण झाले होते. या अल्प जागांमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली अस्वस्थता आणि वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर भाजपची वाट धरली आहे.
कार्यकर्त्यांची अजित पवार गटाकडे धाव सूत्रांच्या माहितीनुसार, जागा कमी असल्याने पक्षश्रेष्ठींनी काही इच्छुक उमेदवारांना थेट अजित पवार गटात जाऊन निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे धनंजय पिसाळ, मनीष दुबे आणि नितीन देशमुख यांच्यासारख्या बड्या पदाधिकाऱ्यांनी आधीच अजित पवार गटात प्रवेश केला. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याच्या भावनेतून राखी जाधव यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
घाटकोपरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता राखी जाधव या सोमवारीच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करतील. त्यांना त्यांच्या हक्काच्या असलेल्या घाटकोपरमधील वॉर्डमधून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला लढवणारा प्रमुख चेहराच गेल्यामुळे शरद पवार गटासमोर आता मुंबईत नेतृत्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे.


